धुळीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱयांना महामार्गावर शिंपडावे लागतेय हजारो लिटर पाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-नागपूर महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली असून 75 किलोमीटरपर्यंतच्या महामार्गावर खड्डय़ांचे साम्राज्य आहे. या महामार्गाच्या आजूबाजूला मोठय़ा प्रमाणावर शेती असून रस्त्यावरील धुळीचा थर पिकांवर बसत आहे. त्यामुळे शेतकऱयांचे प्रचंड नुकसान होत आहे. या धुळीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱयांना दोन ते तीन दिवसांतून एकदा महामार्गावर हजारो लिटर पाणी शिंपडावे लागतेय. उन्हाळ्यात पाण्यासाठीच संघर्ष करावा लागतो. शेतीलाच पाणी देताना नाकीनऊ येते. अशा परिस्थितीत महामार्गावर शिंपडण्यासाठी रोज हजारो लिटर पाणी आणायचे कुठून, असा प्रश्न शेतकऱयांसमोर आहे.

अनेक ठिकाणी महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्यातील अस्फाल्ट खडकांचा थर उखडला गेला असून या खडकांची धूळ उडून पिकांवर बसत असल्यामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत असून शेतकऱयांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. संभाजीनगर ते विजापूरपर्यंतच्या मार्गावर मोठमोठाले खड्डे पडलेले असून गेल्या 20 वर्षांपासून हा रस्ताच दुरुस्त झाला नसल्याचे दहीगाव बोर गावचे शेतकरी दत्तात्रय मेटे यांनी सांगितले. या रस्त्यावरून जेव्हा वाहने ये-जा करतात, मोठय़ा प्रमाणावर वाहतूककोंडी होते तेव्हा प्रदूषण आणि रस्त्यावरील धूळ पिकांचे प्रचंड नुकसान करतात असे माणिकराव उगले यांनी सांगितले. या धुळीमुळे आपल्याला शेतीत मोठे नुकसान सहन करावे लागल्याचे ते म्हणाले. उन्हाळ्यात महामार्ग ओला ठेवण्यासाठी पाण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

लवकरात लवकर महामार्गाची दुरुस्ती 

विजापूरचे तहसीलदार महेंद्र गर्जे यांच्याशी शेतकऱयांनी या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी संपर्क साधला. त्यावेळी या महामार्गाचे लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात येईल असे ते म्हणाले. मुंबई-नागपूर महामार्गाची दुरवस्था आपल्याला माहीत आहे. हा महामार्ग शक्य तितक्या लवकर दुरुस्त करून शेतकऱयांना दिलासा देण्यात येईल असे ते म्हणाले. दरम्यान, गर्जे यांनी अलीकडेच विजापूरच्या तहसीलदारपदाचा पदभार स्वीकारला.