
इराणचा जनरल कासीम सुलेमानी याने अनेक निरपराध लोकांची हत्या केली होती. सुलेमानीने दिल्ली आणि लंडनवरील हल्ल्याचाही कट रचला होता, असा गौप्यस्फोट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
सुलेमानी मारला गेला हे चांगलेच झाले. त्याचा दहशतवाद संपला आहे. अमेरिकेतील राजकीय नेते, लष्करी अधिकार्यांच्या हत्येचा कटही सुलेमानी रचत होता. तसेच दिल्ली आणि लंडनमध्येही हल्ल्याचा कट त्याने रचला होता असे ट्रम्प यांनी सांगितले. मात्र, हिंदुस्थानात केव्हा आणि कसा हल्ला करणार होता याची माहिती ट्रम्प यांनी दिली नाही. 2012 मध्ये हिंदुस्थानातील इस्रायलच्या राजदूतांच्या पत्नीवर कार बॉम्बद्वारे हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. कारमध्ये चुंबकाच्या मदतीने बॉम्बस्फोट घडवून आणला होता. यात राजदूतांच्या पत्नी जखमी झाल्या होत्या. यामागे इराणचा हात असल्याचा आरोप इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांनी केला होता. ट्रम्प यांच्या वक्तव्याचा संदर्भ या घटनेशी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
























































