
ठरलेल्या वेळतच काम पूर्ण करण्यासाठी आवश्यकता भासल्यास कामगारांची संख्या वाढवू पण दहिसर ते डी. एन. नगर मार्गावरील मेट्रो रेल्वे येत्या डिसेंबरमध्ये धावणारच असा विश्वास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) आयुक्त आर. ए. राजीव यांनी व्यक्त केला.
एमएमआरडीए आयुक्त राजीव यांनी आज दहिसर-डी. एन. नगर मेट्रो-2ए प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. 18.8 किलोमीटर लांबीच्या या मार्गावर 17 स्थानके आहेत. या प्रकल्पाचे काम ठरलेल्या वेळेत पूर्ण झाले पाहिजे असे निर्देश त्यांनी संबंधित कंत्राटदारांना दिले. मेट्रो-2ए मार्गावर येत्या सप्टेंबर महिन्यात मेट्रो रेल्वेची चाचणी घेण्याचे ठरले आहे. तत्पूर्वी काम पूर्ण करण्यात येईल असे आयुक्त राजीव यांनी यावेळी सांगितले.
एमएमआरडीएने अलिकडेच मेट्रो-2ए, मेट्रो-2बी आणि मेट्रो-7 च्या गाडयांचे 3816 कोटी रुपयांचे कंत्राट भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड (बीईएमएल) या कंपनीला दिले. ही कंपनी मुंबई मेट्रोसाठी प्रत्येकी सहा डब्यांच्या 84 गाडया बनवणार आहे. इतर आवश्यक उपकरणे आणि यंत्रणेसाठीही ऑर्डर्स देण्यात आल्या आहेत. तिकीटभाडे वसुलीसाठी स्वयंचलित यंत्रणा आणि प्लॅटफॉर्मवरील क्रीन डोअर्सच्या कामाचेही कंत्राट देण्यात आले आहे.





























































