इराणनेच युक्रेनचे विमान पाडले,कॅनडाचा गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराणमध्ये युक्रेनचे प्रवासी विमान कोसळले होते. या दुर्घटनेत आतापर्यंत 176 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. हे विमान तांत्रिक बिघाडामुळे पडले नाही तर ते क्षेपणास्त्राचा मारा करून पाडण्यात आले होते असा गंभीर आरोप कॅनडाने केला आहे. यापूर्वी हाच आरोप अमेरिकेनेही केलेला होता. युक्रेनने संयुक्त राष्ट्राकडे विमान दुर्घटनेच्या चौकशीसाठी विनाशर्त सहकार्य मागितले आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडाऊ यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदीमीर झेलेन्स्की यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि या दुर्घटनेसंदर्भात चर्चा केली. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये युक्रेनच्या नागरिकांची संख्या मोठी होती. कॅनडाचेही नागरीक यामध्ये मृत्यूमुखी पडले आहेत. कॅनडा आणि युक्रेनच्या प्रमुखांनी केलेल्या चर्चेमध्ये या दुर्घटनेची सखोल चौकशी व्हायलाच हवी याबाबत एकमत झाले.

वेगवेगळ्या सूत्रांकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हे विमान पाडण्यात आले होते असं ट्रुडाऊ यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. ही माहिती कॅनडाच्या मित्र राष्ट्रांकडून तसेच कॅनडाच्या गुप्तचर यंत्रणेकडून प्राप्त झाल्याचेही ते म्हणाले. हे विमान इराणमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे पडल्याचे ट्रुडाऊ म्हणाले हे कदाचित मुद्दाम केलेलं कृत्य नसू शकतं मात्र त्यासाठी सखोल चौकशीची गरज असल्याचं ट्रुडाऊ म्हणाले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही ट्रुडाऊ यांच्यासारखाच आरोप केला आहे. त्यांनी म्हटले होते की कदाचित हे कृत्य चुकीने झाले असेल मात्र युक्रेनचे विमान हे क्षेपणास्त्रानेच पाडण्यात आले होते. इराणने मात्र या आरोपांचा साफ शब्दात इन्कार केला आहे. तिथले सरकारचे प्रवक्ते अली रबाई यांनी हा इराणविरोधातील मानसिक युद्धनिती असल्याचं त्यांचे म्हणणे आहे. ज्या देशांच्या नागरिकांचा मृत्यू झाला आहे त्या देशांनी तसेच बोईंग विमान कंपनीने त्यांचे प्रतिनिधी इराणला पाठवावे आणि त्यांनी विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधण्यास मदत करावी असेही ते म्हणाले आहेत.