
शिखांचे पहिले धर्मगुरू गुरू नानक देव यांचे जन्मस्थान असलेल्या पाकिस्तानमधील नानकाना साहिब गुरुद्वारावर मुस्लिमांच्या गटाने दगडफेक केल्याच्या घटनेनंतर पेशावर येथील एका शीख तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली होती. आता या हत्याकांडप्रकरणी धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. भावी पत्नीनेच ही सुपारी दिल्याचा दावा पाकिस्तान पोलिसांनी केला आहे.
मलेशियात राहणारा रवींदर सिंह लग्नासाठी पाकिस्तानमध्ये आला होता. त्याची भावी पत्नी प्रेम कुमारी हिला रवींदर सोबत लग्न करायचे नव्हते. यामुळे तिने रवींदरचा काटा काढण्याचे ठरवले आणि शूटर्सला सुपारी दिली. खैबर पख्तूनख्वां प्रांतातील एका शॉपिंग मॉलमध्ये शूटर्सने रवींदर सिंह याची गोळ्या घालून हत्या केली. यानंतर त्याचा मृतदेह पेशावरमध्ये फेकून देण्यात आला होता. सात लाख रुपयांसाठी शूटर्सने ही हत्या केली.
रवींदर विवाहासाठी मलेशियातून पाकिस्तानात परतला होता. रविंदर हा खैबर पख्तूनख्वां प्रांतातील शांगला जिल्ह्याचा रहिवासी असून, विवाहानिमित्त खरेदी करण्यासाठी तो पेशावर येथे गेला होता. पुढील आठवड्यात त्याचा विवाह होणार होता. या प्रकरणी पेशावर पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवला गेला होता.




























































