‘काळुबाईच्या नावानं चांगभलं’च्या गजरात मांढरगड दुमदुमला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शाकंभरी पौर्णिमेनिमित्त मांढरदेवी यात्रेला मोठा उत्साहात सुरुवात झाली. ‘काळुबाईच्या नावानं चांगभलं’च्या गजरात हाजारो भाविकांनी शुक्रवारी देवीचे दर्शन घेतले. शाकंभरी र्पौर्णिमा यात्रेचा मुख्य दिवस असल्याने सकाळी 6 वा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा मुख्य प्रशासक देवस्थान ट्रस्ट मांढरदेव आर. डी. सावंत यांच्या हस्ते देवीची आरती व महापूजा संपन्न झाली. यावेळी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन डी. आर. शेट्टी, उपविभागीय अधिकारी संगीता चौगुले, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, तहसीलदार रणजित भोसले, विश्वस्त महेश कुलकर्णी, मिलिंद ओक, अतुल दोषी, जीवन मांढरे, चंद्रकांत मांढरे, राजगुरू कोचळे, सुधाकर क्षीरसागर, शैलेंद्र क्षीरसागर, आपत्ती व्यवस्थापनचे देवीदास ताम्हाणे, उपसरपंच शंकर मांढरे व ग्रामस्थ उपास्थित होते.

शुक्रवारी शाकंभरी पोर्णिमा असल्याने गुरुवार रात्रीपासूनच भाविक मांढरदेव येथे दाखल होण्यास सुरुवात झाली होती. गुरुवारी रात्री देवीचा जागर झाल्यानंतर भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. भाविकांना सुलभरीत्या दर्शन व्हावे म्हणून देवस्थान ट्रस्टने कळस दर्शन रांग, देव्हारा रांग व चरण दर्शन रांगा अशा वेगवेगळ्या दर्शन रांगांचे बॅरिकेड्स उभारल्याने भाविकांना देवीचे दर्शन घेणे सुलभ होत होते. शुक्रवारी सकाळी 6 वा. देवीच्या पायरीजवळील दर्शन रांगेतील मुंबई येथील प्रथम भाविक लक्ष्मण रामचंद्र पोतदार व हर्षदा लक्ष्मण पोतदार या दाम्पत्याला देवीच्या पूजेचा मान मिळाला. हे दाम्पत्य गेली सोळा वर्षे देवीच्या दर्शनासाठी येत आहे. या दाम्पत्याचा देवस्थानच्या वतीने देवीचा फोटो देऊन सन्मान करण्यात आला.

देवीच्या मंदिराला मुंबई येथील भाविक कालेकर यांनी पुâलांची सजावट केलेली होती.भाविकांच्या सोयीसाठी वैद्यकीय विभागाची पथके काळुबाई मंदिर, ग्रामपंचायत व उतरणीच्या मार्गावर कार्यरत आहेत.त्याचबरोबर अग्निशमन दलाचे पाण्याचे टँकर, क्रेन, रुग्णवाहिका मंदिर परिसरात तैनात होते. यात्रा सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात्रेत मांढरदेव येथे पशुहत्या करणे, वाद्य वाजवणे, करणी करणे, दारूविक्री करणे यावर बंदी आहे. यात्रेत पशुहत्या होऊ नये म्हणून पोलीस व प्रशासन दक्ष होते.