
अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष वाढत आहे. या संघर्षामुळे आता इराणमध्येच संघर्ष उफाळून आला आहे. इराणमध्ये अनेक ठिकाणी नागरिकांनी मोठ्या संख्येने रस्त्यांवर उतरून सरकारविरोधात निदर्शने केली. तसेच इराणचे सर्वेसर्वा आयातुल्ला खोमेनी यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. इराणमध्ये पहिल्यांदाच खोमेनी यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली आहेत. खोमेनी इराणमधील सर्वोच्च नेते आहेत. तसेच अमेरिकेशी संघर्ष सुरू झाल्यानंतर तसेच इराणचे कमांडर मेजर जनरल कासीम सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर जनता खोमेनी यांच्यामागे उभी होती. मात्र, युक्रेनच्या विमान दुर्घटनेनंतर इराणमध्येच खोमेनी यांच्याविरोधात रोष व्यक्त होत आहे.
इराणची राजधानी तेहरानमध्ये शनिवारी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी रस्त्यांवर उतरून सरकारविरोधात निदर्शने केली. युक्रेनचे विमान पाडल्याचा वृत्ताचा इन्कार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी जनतेची दिशाभूल केली आहे. त्यानंतर या अधिकाऱ्यांनी चूक कबूल केली आहे. काही चुकीमुळे युक्रेनच्या विमानावर मिसाइल डागण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कमांडर इन चीफ यांनी राजीनामा द्यावा, अशी घोषणाबाजी आंदोलकांनी केली. या हल्ल्यामुळे युक्रेनचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले आणि विमानातील 176 प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 82 इराणचे, 63 कॅनडाचे, युक्रेनचे 11, स्वीडनचे 10, अफगाणिस्तानचे 4, जर्मनीचे 3 तर युकेतील 3 नागरिकांचा समावेश आहे.
तेहरानसह इराणच्या इतर भागातही मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली आहेत. विमान दुर्घटनेतील मृतांना श्रद्धाजंली वाहण्यासाठी नागरिक जमले होते. मात्र, त्यानंतर जनतेने त्यांचा रोष व्यक्त केला. आंदोलक आक्रमक झाल्याने पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. यावेळी आंदोलकांनी कमांडर इन चीफ आणि इराणचे सर्वेसर्वा आयातुल्ला खोमेनी यांच्याविरोधात नारेबाजी करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. विमान दुर्घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या आणि जनतेची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात खटला दाखल करण्याची मागणीही करण्यात आली. खोटी माहिती देत जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना फाशी देण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सोशल मीडियावरही पोस्ट करत जनतेने सरकारविरोधातील त्यांचा रोष व्यक्त केला आहे.




























































