महापालिकेची उद्याने-मैदाने फुलली बाल कलाकारांनी, ‘माझी मुंबई’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘माझी मुंबई’ या चित्रकला स्पर्धेला मुंबईतील पालिका आणि खासगी अनुदानित-विनाअनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेत 59 हजार 621 बालचित्रकारांनी सहभाग होता. सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत रंगलेल्या या स्पर्धेमुळे महापालिकेची 45 उद्याने-मैदाने बाल कलाकारांनी फुलली होती.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त पालिकेच्या शिक्षण विभागातर्फे आणि महापौर आयोजित बाल चित्रकला स्पर्धा 2019-2020चे उद्घाटन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते लोअर परळच्या सुनीता दत्ताजी नलावडे मनोरंजन उद्यानात सकाळी झाले. यावेळी खासदार अरविंद सावंत उपस्थित होते. त्यानंतर 10 वाजता महापौरांनी एफ/दक्षिण विभागातील परळच्या कामगार मैदान येथे भेट देऊन बालचित्रकारांच्या चित्रांची पाहणी करीत त्यांचे कौतुक केले. यावेळी उपमहापौर ऍड. सुहास वाडकर, परिवहन व संसदीय कामकाजमंत्री ऍड. अनिल परब, माजी आमदार सुनील शिंदे, सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब, शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक, एफ/उत्तर व एफ/दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष दत्ता पोंगडे, नगरसेविका श्रध्दा जाधव, स्नेहल आंबेकर, नगरसेवक सचिन पडवळ, नगरसेविका प्रज्ञा भुतकर, रोहिणी कांबळे, सिंधू मसुरकर, शिक्षणाधिकारी महेश पालकर तसेच सर्व उपशिक्षणाधिकारी उपस्थित होते.

स्पर्धकांनी साकारलेल्या चित्रातून मुंबईच्या विविध छटा बघायला मिळाल्या. बालचित्रकारांना त्यांचे सुप्तगुण चित्रांच्या माध्यमातून रेखाटण्यास वाव मिळत असल्याने विद्यार्थ्यांना समाधान मिळाले. मुलांच्या मनात भविष्यकाळातील मुंबई शहराविषयी काय विचार आहेत हे त्यांच्या चित्रातून प्रकट झाले.
– किशोरी पेडणेकर, महापौर

कल्पनेला वाव देणारी विषयांची विविधता
इयत्ता 1 ली ते 2री या प्रथम गटासाठी माझी मुंबई, मी व माझी आई, माझा वाढदिवस हे विषय देण्यात आले होते. द्वितीय गट इयत्ता 3 री ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी मी व माझी आजी/आजोबा नाना–नानी पार्कमध्ये, आम्ही किल्ला बनवतो, माझ्या स्वप्नातील मुंबई हे तीन विषय होते. तृतीय गट इयत्ता 6 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही समुद्रकिनारी फिरायला जातो, माझा बेस्ट बसमधील प्रवास, माझी मुंबईतील एस्सेल वर्ल्डची सहल हे तीन विषय होते. इयत्ता 9 वी व 10 या चतुर्थ गटासाठी महाराष्ट्रातील गडकिल्ले, मोबाईलचे दुष्परिणाम, महिला संरक्षण, काळाची गरज हे 3 विषय देण्यात आले होते.

लाखोंची पारितोषिके
स्पर्धेतील प्रत्येक गटात प्रथम (25 हजार), द्वितीय (20 हजार) व तृतीय विजेते (15 हजार) आणि 10 उत्तेजनार्थ प्रती गट (5 हजार प्रत्येकी) याप्रमाणे चारही गटांतून मिळून एकूण 52 विजेत्यांना रोख पारितोषिके व सन्मानचिन्हे प्रदान करण्यात येणार आहेत. विभागस्तरावर प्रत्येक गटात 5 याप्रमाणे चार गटांत 20 याप्रमाणे एकूण 25 विभागांमध्ये पाचशे उत्तम चित्रांना प्रत्येकी 500 रुपये याप्रमाणे एकूण दोन लाख पन्नास हजार रुपयांची पारितोषिके वितरीत करण्यात येणार आहे. एकूण चार गटांत झालेल्या या स्पर्धेत पारितोषिकांची एकूण रक्कम रुपये 6 लाख 90 हजार इतकी आहे. स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर करून समारंभपूर्वक या विजेत्यांना गौरवण्यात येईल.