
साखर उद्योगात तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. सरकारने साखर निर्यातीचे धोरण फार चांगले केले आहे. याचा साखर उद्योगाला भविष्यात भरपूर फायदा होईल, असे प्रतिपादन राज्याचे कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी मुंबईत केले. ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनतर्फे आयोजित दोनदिवसीय ‘एआयएसटीए शुगर कॉनक्लेव-2020’ या परिषदेच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
वळसे-पाटील पुढे म्हणाले की, देशात सध्या उसाचे उत्पादन प्रचंड वाढूनही साखरेची मागणी कमी झाली आहे. यामुळे साखरेची किमान विक्री किंमत देणेही शेतकऱयाला परवडेनासे झाले आहे. लाखो टन ऊस नुसता पडून आहे. यामुळे पुढील काळ साखर उद्योगासाठी मोठा आव्हानात्मक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. साखर उद्योगासमोर जेव्हा कधी संकटे उभी राहिली, तेव्हा सरकारने उपाययोजना राबवून साखर उद्योगाला तारले आहे. आता तर या उद्योगात तंत्रज्ञानाचाही वापर वाढला आहे. त्यातच सरकारतर्फेही वेगवेगळे नवीन बदल केले जात आहेत, साखर उद्योगाला कठीण काळ आला तरी एआयएसटीए, इस्मा, विसमा या साखर उद्योगसंबंधी संस्थांशी तसेच सरकारसोबत चर्चा करून त्याकर तोडगा काढू असेही वळसे-पाटील म्हणाले.































































