
पालघर जिल्हा परिषदेत शिवसेना नंबर वन ठरली आहे. आता जिल्हा परिषदेचा अध्यक्षही शिवसेनेचाच होईल, असे ठाम प्रतिपादन शिवसेना नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ठाणे जिल्हा परिषदेत पहिल्यांदा शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीचा यशस्वी प्रयोग झाला. राज्यातही आता महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे पालघर जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीच्याच फॉर्म्युल्यानुसारच सत्ता स्थापन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पालघर जिल्हा परिषदेच्या दुसऱया सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने भाजपला धोबीपछाड देत सत्तेतून हद्दपार केले. 18 जागा मिळवून शिवसेना नंबर वन पक्ष ठरला. भाजपला अवघ्या 10 जागा मिळाल्या. राष्ट्रवादीने जबरदस्त मुसंडी मारत 15 जागांवर विजय मिळवला. माकपचे 6 तर बहुजन विकास आघाडीचे 4 उमेदवार विजय झाले. 3 जागांवर अपक्षांनी बाजी मारली, तर काँग्रेसला 1 जागा मिळाली. ही निवडणूक शिवसेनेने स्वबळावर लढवली. राष्ट्रवादी-काँग्रेस आणि बहुजन विकास यांनीही स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याचे चित्र निवडणुकीनंतर पुढे आले. त्यामुळे काय होणार? अध्यक्ष कोणाचा होणार? कोण एकत्र येणार? या चर्चांवर एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना भूमिका स्पष्ट केली.
शिवसेनेने पालघरवासीयांचा विश्वास जिंकला आहे. शिवसैनिक गावागावांत आणि पाडय़ापाडय़ांत पोहोचून मदतीसाठी धावून जात आहेत. त्याचीच पोचपावती या निवडणुकांमधून मिळाली आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. पालघरचा खासदार शिवसेनेचा आहे. पालघरचा आमदारही शिवसेनेचाच आहे. पालघर नगर परिषदही शिवसेनेच्याच ताब्यात आली आहे. पालघर जिह्यातील जव्हार नगर परिषद आणि वाडा नगर पंचायतवरही शिवसेनेचा भगवा फडकला आहे. आता जिल्हा परिषदेतही शिवसेनेचाच अध्यक्ष विराजमान होईल असे शिंदे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत मिळून महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार आहे. हाच यशस्वी फॉर्म्युला पालघरमध्येही अस्तित्वात येईल असे त्यांनी ठामपणे सांगितले.























































