
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील कुर्ला स्थानकाजवळील क्रॉसिंगवर मालगाडी घसरल्याने उपनगरीय लोकलची वाहतूक मंगळवारी रात्री विस्कळीत झाली. रात्री साडेअकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे पनवेल आणि वाशी येथे जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या घटनेत सुदैवाने कोणी जखमी झाले नसले रेल्वे परिसरात रहिवाशांकडून ट्रकवरच टाकला जाणारा कचरा आणि रेल्वेचे मेण्टेनन्सकडे होणारे दुर्लक्ष याचा मुद्दा चर्चेत आला आहे.
कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ ट्रॉम्बे पोर्ट ट्रस्ट लाइनची मालगाडी क्रॉसिंग करीत असताना तिचा एक डबा मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास रुळावरून घसरला. त्यामुळे हार्बर मार्गावरील वाशी आणि पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन लोकल सेवेला प्रचंड मोठा फटका बसला. यामुळे लोकलच्या गाडय़ांची एकामागोमाग रांग लागून हार्बरच्या सर्व स्थानकांवर रात्री कामावरून घरी जाणाऱ्या चाकरमान्यांची प्रचंड गर्दी उसळली. ट्रॉम्बे मालगाडी मार्गावरील मालगाडीचा डबा नेमका क्रॉसिंग पॉइंटवरच घसरल्याने उपनगरीय लोकल अडकल्या. त्यानंतर तासाभराने मालगाडीचा घसरलेला डबा उचलण्यात यश आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.


























































