
उत्तराखंड राज्यातील सर्व रेल्वे स्थानकांची नावे आता उर्दूऐवजी संस्कृतमध्ये लिहिलेली दिसतील. सध्या स्थानकांची नावे हिंदी, इंग्रजी आणि उर्दूमध्ये लिहिलेली आहेत. आता उर्दूच्या जागी राज्याच्या दुसऱ्या भाषेत म्हणजे संस्कृतमध्ये लिहिली जाणार आहेत, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
रेल्वेच्या मॅन्युअलनुसार स्थानकांची नावे राज्याच्या दुसऱया राजकीय भाषेतच लिहावीत असे रेल्वेच्या मॅन्युअलमध्येही आहे. त्यानुसार स्थानकांच्या नामफलकावर हिंदी, इंग्रजी आणि संस्कृतमध्ये नावे लिहिण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे, असे उत्तर रेल्वे प्रशासनाचे सीपीआरओ दीपककुमार यांनी याबाबत माहिती देताना सांगितले. ज्येष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापिका रेखा शर्मा यांनी म्हटले की, वास्तविक राज्यातील सर्व रेल्वे स्थानकांच्या नावांचा संस्कृतमध्ये योग्य अनुवाद करणे आमच्यासाठी कठीण काम आहे.
संस्कृत भाषेच्या विकासासाठीच
उत्तराखंड राज्याने 2010मध्ये संस्कृत भाषेला राज्यातील दुसरी राजकीय भाषेचा दर्जा दिला. असे करणारे ते देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी तेव्हा राज्यात संस्कृत भाषेचा विकास करण्यासाठीच हा निर्णय घेतल्याचे म्हटले होते. 2019 मध्ये संस्कृत भाषा उत्तराखंड राज्यात दुसरी राजभाषा बनली आहे.

























































