
ऑल इंडिया बँक रिटायरीज फेडरेशनच्यावतीने नगरच्या प्रोफेसर कॉलनी चौकात विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी डिस्ट्रिक्ट कमिटीचे चेअरमन उमाकांत कुलकर्णी, कॉ. माणिक आडाणे, कॉ.अशोक बडवे आदींसह निवृत्त बँक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ऑल इंडिया बँक रिटायरीज फेडरेशनच्यावतीने मागण्या सादर करण्यात आल्या.
यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या बँक ठेवींना विमा संरक्षण देण्यात यावे, बँक ठेवीवर किमान 9 टक्के व्याजदर द्यावा, कमाल मर्यादा काढून टाकावी, आरोग्य विमा हप्त्यावर जीएसटी आकरण्यात येऊ नये, 90 वर्षांपुढील निवृत्तांना दहा हजार रुपयांपर्यंत वृद्धी करावी, निवृत्ती वेतनधारकांना रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार वाढ करावी, गेल्या 25 वर्षांपासून पेन्शन वाढलेली नाही, दरम्यान देशाचे उत्पन्न हे चार पटीने वाढले आहे. त्यासाठी सर्वच बँक सेवानिवृत्त कर्मचार्यांचे निवृत्ती वेतन हे रिझर्व्ह बँकेच्या निवृत्ती वेतन योजनेनुसार वाढविण्यात यावे. याबाबत इंडियन बँक असोसिएशनने निवृत्तांच्या संघटनांसोबत त्यांच्या मागण्यांविषयी प्रत्यक्ष बोलणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी विविध मागण्यांचे फलक घेऊन, घोषणा देण्यात आल्या. यावेळी विविध पदाधिकार्यांची भाषणे झाली. सकाळी जॉगिंग ट्रक येथे सह्यांची मोहिम राबविण्यात येऊन याबाबत ज्येष्ठ नागरिकांना माहिती देण्यात आली.
























































