Breaking – कोरोना व्हायरसचा हिंदुस्थानमध्ये शिरकाव, केरळमध्ये आढळला पहिला रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीनसह संपूर्ण जगामध्ये धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना व्हायरसचा (Coronavirus) हिंदुस्थानमध्ये शिरकाव झाला आहे. केरळमध्ये कोरोना व्हायरसचा (Coronavirus) पहिला रुग्ण आढळला असून एका तरुणाला याची बाधा झाल्याचे उघड झाले आहे.

चीनच्या व्हूहान विद्यापीठामध्ये हा तरुण शिक्षण होत होता आणि याचवेळी त्याला कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या विद्यार्थ्याची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांचे एक पथक त्याच्यावर लक्ष ठेऊन आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

व्यूहानमध्ये 500 हिंदुस्थानी विद्यार्थी अडकले
चीनमध्ये नागरिकांसह अनेक विद्यार्थी अडकून पडले आहेत. व्यूहान या प्रांतात हिंदुस्थानचे 500 विद्यार्थी अडकले आहेत. बुधवारी परराष्ट्र मंत्रालयाने चीनमध्ये अडकलेल्या हिंदुस्थानी नागरिकांना बाहेर काढण्यासाठी दोन विमान पाठवण्याची योजना आखली आहे. यासाठी सातत्याने चीनसोबत संपर्क साधून असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. व्यूहानमध्ये कोरोना व्हायरसचा अधिक प्रभाव दिसून येत आहे. त्यामुळे येथील अनेक विमानतळ बंद करण्यात आले असून नागरिक अडकून पडले आहेत. येथे खाण्या-पिण्याच्या गोष्टींची कमतरताही भासू लागल्याचे वृत्त आहे.

मृतांची संख्या 170 वर
चीनमध्ये वटवाघूळ आणि सापांमुळे पसरलेल्या कोरोना व्हायरसने आतापर्यंत 170 लोकांचा जीव घेतला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 1700 जणांना नव्याने कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत चीनमध्ये कोरोना व्हायरसने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांची संख्या 7711 वर पोहोचली आहे.

जागतिक आरोग्य आणीबाणी
जगभरातील अनेक देशांनी या व्हायरसची गंभीरतेने दखल घेतली आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव पाहता गुरुवारी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये जागतिक आरोग्य आणीबाणीची घोषणा करण्यात येईल अशी शक्यता आहे.