
पोलिसांच्या रिक्त पदांमुळे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. देशभरातील विविध पोलीस दलांमध्ये पाच लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी जाहीर केलेल्या ‘डाटा ऑन पोलीस ऑर्गनायझेशन ऍज ऑन 1 जानेवारी, 2019’ मधून ही माहिती समोर आली आहे.
देशभरात पोलिसांची एकूण 25 लाख 95 हजार 435 पदे आहेत. यांपैकी 20 लाख 67 हजार 270 पदे भरली असून 5 लाख 28 हजार 165 पदे रिक्त आहेत. ‘ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट’ने या माहितीच्या आधारे केंद्रीय गृह मंत्रालयाकडे नुकताच अहवाल सादर केला. या अहवालानुसार देशातील पोलीस दलामध्ये महिलांची संख्या एकूण पोलीस संख्येच्या केवळ 8.98 टक्के म्हणजेच 1 लाख 85 हजार 696 इतकी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत महिला पोलिसांच्या संख्येत 9.25 टक्क्यांची वाढ झाली आहे.
- 2018 साली पोलीस दलात 1 लाख 50 हजार 690 नव्या पोलिसांची भरती झाली.
- 1 जानेवारी 2019 पर्यंत केंद्रीय सशस्त्र पोलीस बलातील (सीएपीएफ) एकूण पदांची संख्या 10 लाख 98 हजार 779 इतकी आहे. वास्तविक सीएपीएफमध्ये 9 लाख 99 हजार 918 पदेच भरली आहेत.
- सीएपीएफमध्ये महिला पोलिसांची संख्या 29 हजार 532 इतकी आहे. एकूण पोलीस संख्येत हे प्रमाण 2.95 टक्के इतके आहे.
लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी
देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी आहे. प्रति एक लाख लोकसंख्येमागे सध्याच्या घडीला 158.22 पोलीस आहेत, पण प्रत्यक्ष या लोकसंख्येमागे मंजुरी मिळालेल्या पोलिसांची संख्या ही 198.65 एवढी आहे.
पोलीस ठाणीही अपुरी
अहवालानुसार देशभरात 777 पोलीस जिल्हे असून 16 हजार 771 स्वीकृत पोलीस ठाणी आहेत, मात्र प्रत्यक्षात 16 हजार 587 पोलीस ठाणीच अस्तित्वात आहेत. याचबरोबर देशात 2 लाख 4 हजार 807 पोलीस वाहने आणि 4 लाख 27 हजार 529 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत.




























































