आधुनिक भविष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अमित घोडेकर

मोबाईल आणि संगणक क्रांतीनंतर आता भविष्य मोबाईलवरदेखील येऊन ठेपलंय. गेल्या काही महिन्यांत भविष्यावर आधारित अक्षरशः शेकडो मोबाईल ऍप्स आले आहेत आणि ते प्रचंड लोकप्रिय झाले आहेत.

मनुष्याला भविष्यात काय होणार याची खूप उत्सुकता असते. अनेकांना भविष्याची भीती असते तर अनेकांचे भविष्यात काय काय करायचे याचा आराखडादेखील ठरलेला असतो. भविष्याच्या या काळजीपोटी मग आपले जिवाभावाचे मित्र कोण असतात तर ते म्हणजे वर्तमानपत्रातून येणारे दैनिक, मासिक आणि वार्षिक भविष्य. दिवाळी अंकातील वार्षिक भविष्यावर तर अनेकांच्या उडय़ा पडतात. काही लोक तर फक्त वार्षिक भविष्यासाठी दिवाळी अंक विकत घेतात. त्याव्यतिरिक्त अनेक मासिके तर खास भविष्यावर आधारित असतात जी हातोहात विकली जातात. काही वर्तमानपत्र तर खास भविष्यावर वार्षिक अंक काढतात, तर काही वर्तमानपत्रात दररोज आज तुमचा वाढदिवस असेल तर तुमचं वार्षिक भविष्य काय असेल अशा प्रकारचे लेख लिहीत असतात. एकंदरीत भविष्य बघण्यासाठी सगळीकडे मागणी तसा पुरवठा या नियमानुसार खूप काही लिहिले जातेय.

मोबाईल आणि संगणक क्रांतीनंतर आता भविष्य मोबाईलवरदेखील येऊन ठेपलंय. एका दशकापूर्वी जेव्हा संगणक आपला जीव की प्राण होता तेव्हादेखील संगणकावर ग्रह-ताऱयांची क्लिष्ट बेरीज-वजाबाकी करून भविष्य सांगणारे अनेक सॉफ्टवेअर विकसित झाले होते. काही सॉफ्टवेअर तर भविष्य सांगणारेदेखील वापरत असत. कारण कुंडली बनवण्याचे क्लिष्ट काम या सॉफ्टवेअरने खूप सहज केले होते. दिवस बदलत गेले आणि आजकाल सगळं जग हाताच्या बोटावर म्हणजेच मोबाईलच्या क्रीनवर आले आणि कल्पना करू शकणार नाही अशा सगळ्या ऍप्स मोबाईलच्या क्रिनवर आपल्या समोर आल्या. अगदी सोशल नेटवर्किंग असो किंवा मग बँकिंग ऍप्स असो सगळं आपल्या मोबाईलवर विराजमान झाले. मग यात भविष्य सांगणारे ऍप्स कसे मागे पडतील. सुरुवातीला मोबाईलवर काही वर्तमानपत्रात येणारे भविष्य सांगणारे ऍप्स देण्यात आले होते आणि त्यांना लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. मग त्यांचा प्रतिसाद बघून संगणकावर ज्यांनी भविष्यावर आधारित सॉफ्टवेअर बनवले होते त्यांनी त्यांचे सॉफ्टवेअर ऍप्समध्येदेखील बनवले आणि एका क्षणात भविष्यदेखील हाताच्या बोटावर आले. गेल्या काही महिन्यांत भविष्यावर आधारित अक्षरशः शेकडो मोबाईल ऍप्स आले आहेत आणि ते प्रचंड लोकप्रिय झाले आहेत.

 कालनिर्णय भविष्य – या दिनदर्शिकेचे खास भविष्यविषयक मोबाईल ऍप्स आले आहे. यात दिवसाचे भविष्य, आठवडय़ाचे भविष्य आणि मासिक भविष्य देण्यात येते. दिनदर्शिकेप्रमाणे कालनिर्णयची भविष्यावरील मोबाईल ऍपदेखील खूप लोकप्रिय आहे.
 कुंडली ऍप – सध्याच्या काळातील मोबाईलवरची ही सगळ्यात जास्त वापरले जाणारे ऍप आहे. या ऍपमध्ये आपण फक्त जन्म ठिकाण, वेळ, जन्म दिवस टाकून आपली सविस्तर कुंडलीदेखील काढू शकतो. त्याचबरोबर आपले आयुष्यातील सगळे भविष्यदेखील या ऍपमध्ये आपण बघू शकतो. जर आपल्याला काही शंका असतील किंवा आपल्याला काही समस्या असतील तर आपण ई-मेलद्वारे त्यांचे निवारण करू शकतो. त्याचबरोबर लग्नासाठी कुंडली जमवणे इत्यादीदेखील आपण या ऍपमधून करू शकतो.
 ऍस्ट्रोयोगी – जर तुम्हाला काही समस्या असतील आणि तुम्हाला त्यावर मार्गदर्शन हवे असेल तर ऍस्ट्रोयोगी या मोबाईल ऍपमध्ये आपल्याला चक्क व्हिडीओ आणि ऑडिओचा वापर करून अनेक नामांकित ज्योतिषीच्या सल्ला घेता येऊ शकतो. प्रत्येक ज्योतिषी आणि त्याच्याबद्दल लोकांचा अभिप्राय आणि त्यांनी लोकांच्या समस्यांचे कसे निवारण केले याची माहिती तसेच त्यांचे रेटिंग दिले आहे. त्यामुळे कोणतीही व्यक्ती सहज आपल्याला पाहिजे तो ज्योतिषी ठरवून आपल्या समस्यांचे निराकरण करू शकतात. अशा प्रकारची सेवा देणारे हे पहिलेच ऍप असल्यामुळे अनेक लोक हे ऍप वापरत आहेत आणि हे ऍप प्रचंड लोकप्रिय झाले आहे.
 नाडीभविष्य – दक्षिण हिंदुस्थानात अतिशय लोकप्रिय असलेल्या नाडी ज्योतिष या प्रकारात अंगठय़ाच्या ठशावरून भविष्य सांगितले जाते. आता याच प्रकारची ऍप्स बनवली आहे ज्यात मोबाईलच्या कॅमेऱयाचा वापर करून अंगठय़ाचा फोटो काढला जातो आणि नंतर नाडी भविष्य सांगितले जाते. अनेक लोक अशा प्रकारचे ऍप वापरून भविष्य बघत आहेत.
 हस्तरेषाशास्त्र – सध्या मोबाईलवर थेट तुमच्या हाताचा फोटो घेऊन किंवा चेहऱयावरून भविष्य सांगणाऱयादेखील अनेक ऍप्स आहेत. यातदेखील कॅमेरा आणि क्रिनचा वापर करून फोटो घेतला जातो आणि भविष्य सांगितले जाते.
 नूमारोलॉजी आणि टॅरोट रीडिंग – यावरदेखील मोबाईलमध्ये सध्या शेकडो ऍप्स उपलब्ध आहेत आणि अगदी चायनिज भविष्यदेखील उपलब्ध आहे.
भविष्य खरे की खोटे हे माहीत नसताना सध्या मोबाईलच्या विज्ञाननिष्ठ जगात सध्या भविष्य सांगणाऱया ऍप्स नुसत्या धुमाकूळ माजवत आहेत आणि त्यात अनेक नवनवीन वैशिष्टय़देखील देण्यात येत आहेत. त्यामुळे आपली प्रगती नेमकी कोणत्या दिशेने चालली आहे याचा शोध घेण्याची वेळ आली आहे.

[email protected]