
>> विद्या कुलकर्णी
निळीशार डौलदार मान… शरीरावर रंगांची उधळण… देखणे तांबट पक्षी आपल्या देशात सर्वत्र आढळतात.
तांबट/ Barbet ‘नीळकंठी तांबट व पहाडी तांबट’ हे पक्षी तांबट प्रजातीमध्ये सर्वात सुंदर, आकर्षक रंगांचे, जादुई असे आहेत. त्यांना बघण्यासाठी मात्र हिमालयाची सहल करावी लागेल.
तांबट (बार्बेट) उष्णकटिबंधीय पक्ष्यांच्या जवळपास 80 प्रजाती आहेत. त्यांना बार्बेट हे नाव त्यांच्या चोचीच्या तळाशी असलेल्या राठ केसांमुळे (मिशीसारखे) मिळाले आहे. हे पक्षी सामान्यतः समुद्रसपाटीपासून 200 ते 3000 मीटर उंचीवर उत्तराखंड व उत्तर हिंदुस्थानातील सर्व राज्यांत आढळतात. यांचे वास्तव्य सदाहरित दाट जंगले, पानगळीची जंगले, फळबागा, पर्वतमय जंगले आणि झुडुपे, सागवृक्षांची जंगले इत्यादी ठिकाणी असते. त्यांचे खाद्य फळे व किडे-कीटक असते. रानटी फळं, अंजिरे, बेरीज, रानटी मनुका, फुलं, पिस्त्याची फुलं, कळ्या, बियाणं इत्यादीसुद्धा आवडीने खातात. खाद्य शोधण्यासाठी झाडांच्या झावळीमध्ये, झुडुपांमध्ये हे पक्षी दिसतात.
नीळकंठी तांबट / Blue Throated Barbet
नीळकंठी तांबट हे पक्षी ईशान्य पाकिस्तान, नेपाळ, नैऋत्य चीन, थायलंड, मध्य लाओस, उत्तर अन्नाम आणि व्हिएतनाम येथे आढळतात. हिंदुस्थानात हिमालयातील टेकडय़ांमधेही विपुल प्रमाणात यांचे वास्तव्य असते. निळा, लाल व हिरव्या रंगांचे मिश्रण असलेल्या या मोहक पक्षाची शेपटी छोटी असून आतील बाजू निळसर हिरवी असते. चेहरा व गळा निळ्या रंगाचा असतो. डोक्यावर लाल रंगाची टोपी असून त्याला काळ्या पट्टीची किनार असते. डोकं व टोपीच्यामध्ये फिकट निळा पॅच असतो व गळ्यावर छोटे लाल रंगाचे पॅचेस असतात. चोच जाडसर असून मोतिया रंगाची असते. नर व मादी एकसारखे दिसतात. शिशू पक्ष्यांचा रंग फिक्कट असतो. या पक्ष्यांची साद ‘टुकु टुक’ अशी असून त्यांची शीळ कधी लांब, कधी छोटी वेगवेगळ्या सुरांमध्ये असते. या पक्ष्यांचा प्रजननाचा काळ मार्च ते जुलै असतो. प्रजननाच्या काळात कमी उंचीच्या प्रदेशात येतात. नर व मादी एकत्र गाणं गातात, एकमेकांना खाद्य देतात. नरमादी दोघे मिळून वाळक्या फांदीवर छोटेसे भोक करून घरटे बांधतात. घरटय़ाला आतून गवत, मऊसर कापूस, पालापाचोळा यांचा थर लावतात. या काळात मादी दोनवेळा अंडी घालते. मादी 2 ते 5 पातळ कवचाची गुळगुळीत, लांबट आकाराची अंडी देते. ती 14 दिवस उबवते. पिलांना नरमादी दोघे मिळून सांभाळतात.
पहाडी तांबट / Great Barbet
पहाडी तांबट या पक्ष्यांचे प्रजनन हिमालयामध्ये समुद्रसपाटीपासून कमी ते मध्यम उंच प्रदेशात-उत्तर हिंदुस्थानात, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि दक्षिणपूर्व आशियातील काही भाग इत्यादी ठिकाणी होते.
गुबगुबीत, गोंडस अशा या पक्ष्यांची मान, शेपटी लहान असून डोकं मोठे असते. चरबीदार शेपटीचा पिसारा हिरव्या रंगाचा असून टोकं पिवळसर हिरवी असतात. डोक्याचा रंग गडद काळसर निळा असून चोचीचा रंग पिवळसर मोतिया असतो. पाठ, छाती तपकिरी रंगाची असते. पाठीची वरील बाजू गडद ‘तपकिरी किंवा लालसर तपकिरी’ असून त्यावर बारीक फिकट पिवळ्या रंगाच्या रेषा असतात. मधील बाजू पिवळसर-तपकिरी रंगाची असते. पाठ खालील बाजूस हिरव्या रंगाची असते. पोटाचा रंग पिवळा असून त्यावर हिरव्या रंगाच्या रेषा असतात. बुडी लाल रंगाची असून पंखांचा पिसारा हिरव्या रंगाचा असतो. नर, मादी व शिशू पक्षी सारखेच दिसतात. नराची साद खूप उंच स्वरात ‘केहो’ अशी असते व धोक्याची सूचना कर्कश ‘कियाब’ अशी असते. एरवी नर ‘पियू पियू’ असे गोड स्वरात गाणे गातो. प्रजननाचा काळ एप्रिल ते जुलैदरम्यान असतो. या काळात मादी 2-3 वेळा अंडी देते. प्रजननाच्या काळात कमी उंचीच्या प्रदेशात ते येतात. वाळक्या फांदीमध्ये छोटेसे भोक करून घरटे बांधतात. त्यांचे घरटे फांदीच्या पोकळीत जमिनीपासून 10 ते 15 फुटांपर्यंत किंवा सुतार पक्ष्याच्या घरटय़ातच असते. मादी एका वेळी 2 ते 4 अंडी देते. 13 ते 15 दिवसांत अंडी उबून पिले बाहेर पडतात. पिलांना नरमादी दोघेही सांभाळतात.
ध्यानस्थ बसलेल्या या रंगीबेरंगी पक्ष्यांचे फोटो सहजपणे काढता आले व त्यांचे मोहक रूप पाहून मन सुखावले.


























































