वधुच्या ‘महागड्या’ मागण्यांनी वैतागला, नवऱ्या मुलाने मोडलं लग्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपण बऱ्याच वेळा हुंडाबळी किंवा हुंड्यासाठी छळ अशा बातम्या वाचतो. हुंडा ही वधुपक्षाने देण्याची रीतच असलेले महाभाग अजूनही या देशात अस्तित्वात आहेत, असं वाटून आपल्यालाच आश्चर्य आणि संताप येतो. पण, हीच प्रथा उलट असेल आणि अशाच हुंड्यापायी एखादं लग्न मोडलं तर?

असं खरोखर घडलं आहे. पण ते हिंदुस्थानात नव्हे तर नायजेरियात. नायजेरियात राहणाऱ्या अँडरसन नावाच्या माणसाने त्याचं लग्न वधुपक्षाने केलेल्या महागड्या मागण्यांना कंटाळून मोडलं आहे. ‘तुझे खर्च भागवू शकेल’, असा नवरा शोधण्याचा सल्लाही त्याने तिला दिला आहे. त्याचं झालं असं की नायजेरियात ‘ब्राईड प्राईज’ नावाची एक प्रथा आहे. या प्रथेनुसार नवऱ्या मुलाला लग्नाआधी नवऱ्या मुलीला काही रक्कम किंवा भेटवस्तू द्यावीच लागते.

अँडरसनकडेही त्याच्या वाग्दत्त वधुने या प्रथेनुसार मागणी केली. पण, ती यादी इतकी मोठी आणि भरमसाठ महागड्या वस्तूंची होती. ती यादी बघून अँडरसनला फेफरं यायचं बाकी राहिलं होतं. अखेर बायकोचे महागडे शौक पाहून अँडरसनने हे लग्नच मोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्याने तिचे शौक पूर्ण करू शकेल असाच मुलगा शोधण्याचा सल्लाही दिला आहे.