
इतिहासातील अंतराळात अनेक गोष्टी मानवाने पहिल्यांदाच करण्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यात आता अजून एका अनोख्या विक्रमाची भर पडली आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील अंतराळवीरांनी विशेषतः मायक्रोगॅविटीमध्ये काम करण्यासाठी तयार केलेल्या खास ओव्हनचा वापर करून अन्न तयार (बेक) केले आहे. अंतराळवीर ल्यूक पर्मिटानो आणि क्रिस्टीना कोच यांनी ख्रिसमसच्या काळात वेगवेगळ्या बॅचमध्ये पाच चॉकलेट चिप कुकीज बेक केल्या. अन्न आणि विज्ञान प्रयोगाचा एक भाग म्हणून हा प्रयोग राबवण्यात आला आहे. लांब पल्ल्याच्या अंतराळ प्रवासात स्वयंपाकाचे पर्याय शोधणे हा या प्रयोगाचा मुख्य उद्देश होता.
प्रयोगादरम्यान स्पेस स्टेशन ताज्या कुकीजच्या सुगंधाने भरलेले असताना अंतराळवीरांना मात्र त्यापैकी कशाचाच आस्वाद मिळाला नाही. या पाच कुकीजपैकी तीन कुकीज या महिन्याच्या सुरुवातीस परीक्षणासाठी पृथ्वीवर परत आणण्यात आल्या आहेत. कुकीज बेक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या अंतराळवीरांच्या या विशेष स्पेस ओव्हनची रचना न्यूयॉर्कमधील झीरो जी किचन नावाच्या जोडगोळीने डिझाईन केली आणि बनवली आहे. या ओव्हनला स्पेस स्टेशनच्या सर्व्हिस प्रोव्हाइडर असलेल्या नॅनोरेक्स कंपनीने इन्स्टॉल करून दिले आहे. हा अनोखा स्पेस ओव्हन नियमित मायक्रोवेव्ह युनिटपेक्षा थोडा मोठा दिसतो आणि बेकिंग फूडसाठी यात लांब, टय़ूबलर विभाग दिलेला आहे. हा स्पेस ओव्हन नेहमीच्या वापरातील स्वयंपाकघरातील टोस्टरप्रमाणेच इलेक्ट्रिक हीटिंग घटकांवर अवलंबून आहे. स्पेस स्टेशनच्या अंतर्गत ऊर्जा ग्रिडमधून अल्प प्रमाणात ऊर्जा मिळवून तिचा वापर बेकिंगसाठी करण्यायोग्य असे या स्पेस ओव्हनचे डिझाईन तयार करण्यात आले आहे. प्लग आणि प्ले सुविधेचा हा ओव्हन 177 डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत अन्न गरम करू शकतो. सीएनएनच्या अहवालानुसार अंतराळवीरांनी पहिल्या चार कुकीजसाठी 148.8 डिग्री सेल्सिअस तापमानावर अनुक्रमे 25 मिनिटे, 75 मिनिटे आणि 120 मिनिटांचा वेळ घेतला. पाचव्या कुकीजसाठी मात्र त्यांनी थोडे अधिक उष्णतामान वापरले.




























































