
चिकनच्या नावाखाली कौवा बिर्याणी विकली जात असल्याचा एक प्रसंग एका चित्रपटात आहे. बहुतेक सगळ्यांनाच तो लक्षात असेल. तो प्रसंग प्रत्यक्षात घडला तर? तर कशाला असा प्रसंग प्रत्यक्षात घडला आहे. खरोखर रस्त्यावरच्या स्टॉलवर कौवा बिर्याणी विकली जात आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, तामिळनाडूतील रामेश्वरम येथे हा प्रकार घडल्याचं उघड झालं आहे. इथे एका रस्त्यावरच्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर अन्न आणि औषध प्रशासनाने धाड टाकली. तेव्हा तिथे मिळणारा खाद्यपदार्थ पाहून धक्काच बसला. या स्टॉलवर एक माणूस स्वस्तात चिकन विकत होता. मात्र, ते कोंबडीचं नव्हे तर कावळ्याचं मांस होतं. ते मांस तो बिर्याणीत टाकून देत होता. त्याच्याकडे जवळपास 150 मेलेले कावळेही आढळले.
या स्टॉलविषयीचा खुलासाही काही श्रद्धाळू नागरिकांमुळे झाला. रामेश्वरच्या मंदिरात नेहमी दर्शनाला येणारे भाविक इथल्या कावळ्यांनाही दाणे टाकतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांना कावळ्याच्या थव्यामधले अनेक कावळे मृतावस्थेत आढळू लागले होते. त्यामुळे कोणीतरी कावळ्यांवर विषप्रयोग करत असावं, असा दाट संशय या भाविकांना आला होता. त्यामुळे त्यांनी पोलिसात तक्रारही दिली होती.
त्यांच्या तक्रारीनंतर अन्न आणि औषध प्रशासनाने ही धाड टाकली, तेव्हा स्टॉलचा मालकच विषारी भात खायला घालून कावळ्यांचा जीव घेत असल्याचं आढळून आलं. तो कावळ्याचं मांस चिकन लॉलीपॉप आणि चिकन बिर्याणी म्हणून विकत होता. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याचा स्टॉलही बंद केला आहे.

























































