
मंदिर, जत्रा या ठिकाणी भिक्षा मागून मिळालेल्या पैसे मंदिरांसाठी आणि अनाथाश्रमाला दान करणारी गावकर आजी म्हणून मालवणात सर्वांना परिचित असणाऱ्या कुंभारमाठ मालवण येथील रहिवासी श्रीमती सुनंदा शिवराम रावले (वय 81) यांचे प्रदीर्घ आजाराने नुकतेच निधन झाले.
मालवण देऊळवाडा येथील शालिनी परशुराम गावकर यांचा विवाह नेरूरपार येथील शिवराम रावले यांच्याशी झाला होता. मात्र लग्नानंतर तिच्या पतीने दुसरा विवाह केल्याने ती मालवण येथे आपल्या माहेरी वास्तव्यास आली होती. प्रारंभीच्या काळात तिने मोलमजुरी करून उदरनिर्वाह केला. मात्र त्यानंतर तिने मालवणमधील श्री देव रामेश्वर, श्री देव नारायण, हनुमान मंदिर याठिकाणी तसेच तालुक्यातील मंदिरांच्या जत्रांमध्ये ती भिक्षा मागत असे.
गावकर आजींचे भिक्षा मागणे कुटुंबीयांना खटकत असे. मात्र दहा वर्षांपूर्वी शालिनी गावकर यांनी भिक्षेतून मिळालेल्या 80 हजार रुपयातून देऊळवाडा येथील रामेश्वर मंदिरासाठी सोन्याची रुद्राक्षाची माळ आणि श्री देव नारायणासाठी सोन्याच्या कुडा दान केल्या. पाच वर्षांपूर्वी चिंदर येथील एका देवस्थानाला 15 हजार रुपयांची सढळ हस्ते मदत केली.
मृत्युपूर्वी शालिनी यांनी त्यांचा भाचा विनय गावकर यांना भिक्षाद्वारे मिळालेल्या रक्कम ही मंदिरासाठी आणि अनाथाश्रमाला दान म्हणून द्यावे, असे सांगितले होते. त्यामुळे श्रीमती शालिनी गावकर हिने भिक्षेतून मिळवलेल्या रक्कमेतील 1 लाख 11 हजार 111 रुपये कुंभारमाठ येथील श्री देवी जरीमरी तर पाच हजार रुपयांची रक्कम मारुती मंदिरासाठी देण्यात येणार आहे. यातून शिल्लक राहिलेली उर्वरित रक्कम गरीब आणि अनाथ मुलांच्या कल्याणासाठी वापरण्यात येणार आहे.
विनय गावकर यांनी पणदूर आणि अणाव येथील अनाथ आश्रमाना अन्नदानाच्या दृष्टीने धान्य व इतर साहित्याचे वाटप नुकतेच केले. गावकर आजीच्या पश्चात सात भाचे, दोन भाऊ, भावजयी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.


























































