घरावरील संकट दूर करण्याचे सांगत लाखो रुपये उकळले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुमच्या घरावर संकट कोसळले असून आपण ते संकट दूर करू, असे सांगत परळी वैजनाथ येथे एका कुटुंबाकडून लाखो रुपये उकळण्यात आल्याची घटना घडली आहे. दोन वर्षांपासून तुमच्या परिवारावर संकट आले आहे. ते दूर करण्याचे सांगत आरोपींनी आपली दिशाभूल करत वारंवार पैशाची मागणी केली आणि आपल्याला लाखो रुपयांना गंडा घातल्याची तक्रार परळी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. सुदामती रत्नाकर गुट्टे (रा.जयनगर,परळी वैजनाथ) यांनी ही तक्रार दाखल केली आहे. डिसेंबर 2018 ते जानेवारी 2020 पर्यंत आरोपी मंजुबाई गणेश पुजारी व गणेश पुजारी (रा. जलालपूर रोड, परळी वैजनाथ) यांनी संगनमत करून आपल्याकडून लाखो रुपये उकळल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

आजपर्यंत चार लाख रुपये व दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने असा ऐकून 5, 60,000 रुपयांचा ऐवज आरोपींनी आपल्याकडून घेतला आहे. याचप्रमाणे आरोपींनी आणखी दहा लाख रुपयांची मागणी केली. ही रक्कम दिली नाही तर परिवाराला संपवून टाकू अशी धमकीही देण्यात आली. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा अधिक तपास सहपोलीस निरीक्षक आरती जाधव करत आहेत.