
महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार असलेल्या गडकिल्ल्यांवर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱयांना राज्य सरकारने चाप लावला आहे. गडकिल्ल्यांवर मद्यपान केल्यास अथवा बाहेरून मद्यपान करून गडकिल्ल्यांवर येऊन गैरवर्तन केल्यास थेट तुरुंगवासच भोगावा लागणार आहे. अशा तळीरामांना सहा महिन्यांचा तुरुंगावास तसेच दहा हजार रुपयांपर्यंतच्या दंड ठोठावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या गृह विभागाने घेतला आहे.
गडकिल्ल्यांकर गेल्या काही काळात दारूपाटर्य़ा करून धिंगाणा घालण्याचे प्रकार उघडकीस आले होते. महाराष्ट्रात साडेतीनशेच्या वर गडकिल्ले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देत हे किल्ले शेकडो वर्षे उभे आहेत. या किल्ल्यांचे पावित्र्य भंग होईल अशा गोष्टी सातत्याने उजेडात येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला घेतला असून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम 85 अंतर्गत आता कारवाई करण्यात येणार आहे.
शिक्षेचे फलक दर्शनी भागात
शिक्षेबाबतच्या तरतुदी सर्व गडकिल्ले व पुरातन वास्तूंच्या दर्शनी भागात जनतेच्या माहितीस्तव लावण्यात येणार आहेत. दारूबाजांवर पोलीस तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत कारवाई करण्यात येणार आहे.






























































