देशात फूट पाडण्याचा केंद्राचा एककलमी कार्यक्रम; येचुरी यांचा मोदी सरकारवर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sitaram-yechuri

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी रविवारी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला. देशाची भयानक परिस्थितीतून वाटचाल सुरू आहे. मोदी सरकार केवळ समाजात फूट पाडा आणि हिंसा घडवा, हाच एककलमी कार्यक्रम गेली सात महिने राबवतेय, अशा शब्दांत टीका करीत येचुरी यांनी सरकारच्या या अजेंड्याविरोधात तरुणाईला एकत्र येण्याचे आवाहन केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील ‘मुंबई कलेक्टिव्ह’ कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या वेळी त्यांनी सीएए आणि एनआरसीबाबतच्या सरकारच्या भूमिकेचा समाचार घेतला. कुणी सीएएवर बोलले की त्याला देशद्रोही ठरवले जाते. तुम्ही पाकिस्तानची भाषा बोलत आहात, असा ठपका मारला जातोय. देशात बेरोजगारी वाढलेय. शेतकरी आत्महत्या करताहेत. कारखाने बंद होताहेत. सरकारला याचे काहीही सोयरसुतक नाही, असेही येचुरी म्हणाले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही भाषण केले. देशात द्वेषाच्या राजकारणातून फूट पाडली जातेय, असे त्या म्हणाल्या.