भांडुपमध्ये सुरू झाली ब्लँकेट बँक, फोन कॉलवर गरजुंना मोफत मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
blanket-bank

डिसेंबर पासून मुंबईमध्ये कडाक्याची थंडी जाणवू लागल्यापासून अनेक सामाजिक संस्था गोर गरिबांना ब्लँकेट वाटप करण्यासारखे कार्यक्रम राबवत आहेत. परंतु निधी अभावी प्रत्येकाची गरज भागवणे शक्य होत नाही. अशातच मुंबई जिल्हा सहकारी हाऊसिंग फेडरेशनचे तज्ज्ञ संचालक विशाल कडणे यांनी ब्लँकेट बँकचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत संस्थेच्या प्रतिनिधींना फोन कॉल्स केल्यास त्याची योग्य ती शहानिशा करून तेथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या हातून गरजू व्यक्तींपर्यंत मोफत ब्लँकेट पोहोचवले जाते.

या उपक्रमात रात्री रस्त्यावर झोपून रात्र काढणारे आर्थिक दुर्बल घटक, परेल येथील टाटा हॉस्पिटलच्या बाहेर रात्रीत कुडकुडत उभे राहणारे रुग्णांचे नातेवाईक, सहकारी गृहनिर्माण संस्थांचे रात्रपाळी करणारे सुरक्षा रक्षक इत्यादी व्यक्तींना प्राथमिकता दिलेली आहे. आतापर्यंत 500 हून अधिक गरजुंना सदर ब्लँकेट बँक अंतर्गत ब्लँकेट पोहोचवण्यात आल्याचे विशाल कडणे यांनी सांगितले.

हा उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा अशी विनंती विशाल कडणे यांनी केली आहे. भांडुप येथील दैवज्ञ चषक समन्वयक समितीने ही योजना आयोजित केली असून जात, धर्म, भाषा ह्या भीतीच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्म जोपासण्याचा प्रयत्न करणेबाबतचा प्रामाणिक उद्देश ह्या ब्लँकेट बँकचा असल्याचे समिती सदस्य गौरव पोतदार यांनी सांगितले. फेब्रुवारी शेवट पर्यंत हा उपक्रम चालू राहणार असून अधिकाधिक गरजूपर्यंत हा उपक्रम पोहोचावा असा प्रयत्न सर्वानी करावा अशी विनंती विशाल कडणे यांनी केली आहे.