सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील रिक्षा नंबरवरून 14 लाखांच्या दागिन्यांचा शोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लग्नसमारंभाहून घरी परतत असताना रिक्षात आणि अलिबागला लग्नासाठी जाताना लोकलमध्ये विसरलेली बॅग पोलिसांनी काही तासांतच शोधून काढली. दहिसर आणि बोरिवली रेल्वे पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दहिसर येथे राहणारे अनिल टिकेकर हे रविवारी बोरिवली येथे लग्नाला गेले होते. रात्री ते रिक्षाने घरी जात होते. प्रवासात त्यांची 14 लाख रुपये किमतीचे सोने असलेली बॅग ते रिक्षात विसरले. घरी आल्यावर सोन्याच्या वस्तू असलेली बॅग नसल्याचे अनिल यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याची दखल घेऊन वरिष्ठ निरीक्षक एम. मुजावर यांच्या पथकातील पोलिसांनी तपास सुरू केला.

पोलिसांनी सीसीटीव्हीची पाहणी केली. सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेरॅमध्ये त्या रिक्षाचा नंबर पोलिसांना दिसला. त्यानंतर तपासाची चक्रे फिरली. पोलिसांनी पुण्याच्या वाहन ऍपमध्ये त्या रिक्षाचा नंबर अपलोड केला. त्यावरून पोलिसांना रिक्षाच्या मालकाची माहिती मिळाली. सहाय्यक निरीक्षक अभिनय पवार यांनी रिक्षाचालक नंदलाल पालचा नंबर मिळवला. त्याच्याकडून पोलिसांनी 14 लाख रुपये किमतीचे दागिने असलेली बॅग जप्त केली व ती टिकेकर यांना आज परत केली.

बोरिवली रेल्वे पोलिसांनीदेखील प्रवासात विसरलेली बॅग काही तासांत शोधून काढली. अंधेरी येथे राहणारे जयेश पालव हे नातेवाईकाच्या लग्नासाठी अलिबागला जात होते. आज त्यांनी अंधेरीहून चर्चगेटला जाणारी लोकल पकडली. प्रवासात त्यांनी बॅग रॅकवर ठेवली. त्या बॅगेत 2 लाख 30 हजार रुपये किमतीच्या वस्तू होत्या. रॅकवर बॅग विसरल्याचे पालव यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी हेल्पलाइनवर फोन करून बॅग हरवल्याची माहिती दिली. दुपारी लोकल बोरिवली रेल्वे स्थानकात आली तेव्हा गस्तीवर असलेले पोलीस शिपाई दातीर हे फलाट क्रमांक 5 वर आलेल्या लोकलच्या एका डब्यात गेले. तेथे त्यांना एक काळ्या रंगाची बॅग दिसली. त्यांनी ती बॅग पालव यांना परत केली.