आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही! भाजपच्या बेताल शेलारांना आव्हाडांनी सुनावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ncp leader jitendra awhad

‘सीएए’ कायद्याच्या अंमलबजावणीवरून राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत ‘हे तुमच्या बापाचे राज्य आहे का?’ असे बेताल वक्तव्य भाजप आमदार आशीष शेलार यांनी केले. या वक्तव्याचा सर्वत्र निषेध आणि प्रचंड संताप व्यक्त होत असून, आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही. महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शेलार यांच्यावर हल्ला केला आहे. तर तुम्हाला मुंबईत फिरणेदेखील अशक्य होईल, असा इशारा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिला आहे.

रविवारी रात्री आशीष शेलार यांनी नालासोपाऱ्यात बेताल वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर आता चोहोबाजूंनी टीका होत आहे. एवढेच नव्हे तर, संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या पुतळय़ास बांगड्या भरून जोडेही हाणले. शेलार यांच्या वक्तव्याचा जितेंद्र आव्हाड यांनी खरपूस समाचार घेतला आहे. मुख्यमंत्र्यांना उद्देशून केलेले वक्तव्य शेलार यांना शोभत नाही. भाजपच्या हातातून सत्ता निसटल्याने भाजप अस्वस्थ आहे, असे जीतेंद्र आव्हाड म्हणाले. मी त्यांना आजच सांगतो की, ‘होय, हे उद्धव ठाकरेंच्या बापाचंच राज्य आहे, हे जितेंद्र आव्हाडच्या बापाचंच राज्य आहे. मराठी मातीला आई आणि मराठी माणसाला बाप मानण्याची आमची संस्कृती आहे. आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही’ असे प्रत्युत्तर आव्हाड यांनी दिले आहे.

पुन्हा बाप काढाल तर याद राखा -उदय सामंत
पुन्हा बाप काढाल तर याद राखा, आम्ही आधी शिवसैनिक आहोत मग मंत्री. शिवसेनेला प्रतिकार कसा करावा हे सांगावे लागत नाही, असा इशारा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिला.

ज्यांचा बाप काढताय त्यांनी जर मनात आणले तर मुंबईत फिरणं अशक्य होईल
भाजपने इतके घसरण्याची गरज नाही. त्यांना आशा होती ती पूर्ण झाली नाही म्हणूनच भाजप चिडली आहे आणि बाप काढण्याच्या पातळीवर गेली. आपण कुणाचा बाप काढतो आहोत याचेही यांना भान राहिलेले नाही. ते ज्यांचा बाप काढतात त्यांनी जर मनात आणले तर यांना मुंबईत फिरणेदेखील अशक्य होईल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे.