
रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकल्पबाधित अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन शिवसेना नेते व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मध्यस्थीने स्थगित करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील नागोठणे ते गुजरातमधील दहेजपर्यंत गॅस पाईपलाईन टाकण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीतून पाईपलाईन टाकली आहे. रिलायन्स गॅस कंपनीने प्रकल्पबाधित शेकडो शेतकऱ्यांना जमीन व पिकाची नुकसानभरपाई देताना पक्षपात केला. याविरोधात शेतकऱ्यांनी विष्णुभाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली अर्धनग्न आंदोलन पुकारले होते. आंदोलनकर्ते शेतकरी न्याय मिळण्याकरिता पेण ते मातोश्रीपर्यंत अर्धनग्न अवस्थेत लाँगमार्ग करणार होते.
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील, आमदार महेंद्र थोरवे यांच्याशी याबाबत चर्चा केली. तसेच लवकरच मंत्रालय स्तरावर या शेतकर्यांना न्याय मिळवून देण्याकरता बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगतले. त्यामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती विष्णूभाई पाटील यांनी दिली. तसे लेखी पत्र पेणच्या प्रांताधिकारी प्रतिभा पुदलवाड यांनी शेतकऱ्यांना दिले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, पालकमंत्री रवींद्र चव्हाण व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केवळ आश्वासने दिली. रिलायन्स गॅस कंपनीने प्रकल्पबाधित शेकडो शेतकऱ्यांना जमीन व पिकाची नुकसान भरपाई देताना भेदभाव केला आहे. काही शेतकऱ्यांना 80 हजार रुपये प्रति गुंठा तर काहींना 5 लाख तर काहीना 7 लाख तर काहींना 8 लाख रुपये प्रति गुंठा मोबदला देऊन शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असा आरोप विष्णूभाई पाटील यांनी केला आहे.




























































