
अमरावती जिल्हा परिषदेतील भाजपचे जिल्हा परिषद सदस्य शरद मोहोड यांना 40 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. ही कार्यवाही अमरावती जिल्हा परिषद परिसरात मंगळवारी दुपारी आरोग्य विभागाच्या कार्यालयासमोर करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सीमाडोह येथे महाकाली वसतीगृह आहे. या वसतीगृह व संस्थेचे अनुदान व कर्मचारी यांचे मानधन मिळवून देण्याकरीता संस्थेच्या सचिवांनी मोहोड यांच्याकडे मागणी केली होती. त्याच्या मोबदल्यात मोहोड यांनी 50 हजाराची लाच मागितली होती. त्यानुसार पहिला हप्ता म्हणून 20 हजार रुपये देण्याचे तक्रादारांनी मान्य केले. त्यानुसार मंगळवारी शरद मोहोड 20 हजाराची रक्कम घेण्यासाठी गेले व त्यांनी 20 हजाराची रक्कम स्विकारताच सापळा लावलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी त्यांना रंगेहाथ अटक केली. ही कार्यवाही पोलीस अधिक्षक श्रीकांत धीवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी दुपारी करण्यात आली आहे.






























































