
तमिळ चित्रपट ‘वेदालम’ वर आधारीत हिंदी चित्रपट बनवण्याचे टी-सिरीजने ठरवलं आहे. तमिळ चित्रपटामध्ये अभिनेता अजित याने साकारलेली भूमिका हिंदी चित्रपटात जॉन अब्राहम करणार असल्याचे नक्की झाले आहे. या चित्रपटाची कथा ही कोलकात्यामध्ये टॅक्सी चालवणाऱ्या आणि बहिणीची काळजी घेणाऱ्या व्यक्तीभोवती फिरणारी आहे.
टी-सिरीजचे भूषण कुमार आणि जॉन अब्राहम हे हिट समीकरण सत्यमेव जयते, बाटला हाऊस यामुळे रुढ झालं होतं. आगामी चित्रपट ‘मुंबई सागा’, ‘सत्यमेव जयते 2’, ‘एक व्हिलन-2’ हे या जोडगोळीचे आगामी चित्रपट निश्चित झाले आहेत. त्यातच भर पडलीय ती वेदालम या चित्रपटाच्या हिंदी रिमेकची. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित धवन करणार असल्याचे कळाले आहे.
तमिळ चित्रपट वेदालममध्ये अभिनेता अजित याने ‘गणेश’ नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. त्याच्या बहिणीची भूमिका लक्ष्मी मेनन हिने साकारली होती.

श्रृती हसन ही देखील या चित्रपटात होती आणि तिची भूमिका ‘गणेशच्या’ प्रेयसीची होती. लक्ष्मी मेनन आणि श्रृती हसनने साकारलेल्या भूमिका हिंदी चित्रपटात कोण साकारणार हे निश्चित झालेलं नाहीये.

या चित्रपटाचा उत्तरार्थ प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा होता, जो जॉन अब्राहम आणि भूषण कुमार यांना प्रचंड आवडल्याने या दोघांनी हा चित्रपट करण्याचं ठरवलं.


























































