माहुलमधील प्रदूषणावर तातडीने उपाययोजना करा, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माहुल परिसरातील प्रदूषण कमी करण्यासंदर्भात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण विभागासह माहुल परिसरातील प्रमुख कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक बोलावली होती. राष्ट्रीय हरित लवादाच्या सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी करून या परिसरातील प्रदूषणाचे नियंत्रण करावे, असे आदेश पर्यावरणमंत्र्यांनी यावेळी दिले.

माहुल येथील वाढत्या प्रदूषणाचा परिणाम हा फक्त त्या भागापुरता मर्यादित न राहता मुंबईतील इतर भागांतही होत आहे. उद्योग आवश्यक आहेतच, पण त्याबरोबर पर्यावरणाचे रक्षणही आवश्यक आहे. त्यानुषंगाने राष्ट्रीय हरित लवाद यांनी सूचना दिलेल्या आहेत. माहुल भागातील उद्योग हे पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने आवश्यक निकषांची पूर्तता करतात किंवा नाही याची पडताळणी होणे आवश्यक आहे. सांडपाणी व्यवस्थापन, ग्रीन झोनची निर्मिती, हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठीच्या उपाययोजना आदींची अंमलबजावणी करावी असे आदित्य ठाकरे म्हणाले.

यावेळी एचपीसीएल, बीपीसीएल यांच्या प्रतिनिधींनीही काही प्रश्न मांडले. रस्त्यांचा प्रश्न, पार्किंगचा प्रश्न आदी मुद्दे त्यांनी उपस्थित केले. यावर संबंधित विभागांशी चर्चा करून हे प्रश्न सोडविण्यात येतील, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

या बैठकीला पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई. रवींद्रन, आयसीटीचे प्रा. जी. डी. यादव, एचपीसीएलचे व्ही. एस आगाशे, बीपीसीएलचे पी. व्ही. रवीतेज, निरीचे डॉ. तुहीन बॅनर्जी, सुधीर मल्होत्रा उपस्थित होते.