मोदी-शहांच्या पराभवासाठी दिल्ली जाळणार का? नड्डा यांचा केजरीवाल यांना सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शाहीन बागमध्ये गोळीबार करणारा तरुण हा आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता असल्याचे उघड झाल्यानंतर बुधवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ‘आप’चे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पराभवासाठी तुम्ही दिल्ली जाळणार का, असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचाराचा धुरळा चांगलाच उडाला आहे. दिल्लीचे तख्त जिंकण्याच्या ईष्येने पेटलेले नेते एकमेकांवर जोरदार टीका करू लागले आहेत. याचदरम्यान नड्डा यांनी शाहीन बागमधील गोळीबाराच्या घटनेवरून केजरीवाल यांना टार्गेट केले. केजरीवालजी, जर तुम्ही काम केले असते तर ही वेळ आली नसती. आधी जामिया आणि सीलमपूर येथे जमावाला भडकवले. न्यू फ्रेंड्स कॉलनीमधील जाळपोळ आणि दगडफेक केली. पुन्हा शाहीन बागमध्ये धरणे आणि आपल्याच कार्यकर्त्याकडून गोळीबार घडवला. मोदी आणि शहा यांच्या पराभवासाठी दिल्ली जाळणार का, असा खडा सवाल नड्डा यांनी ट्विटद्वारे केला. त्यांनी मंगळवारीही आम आदमी पार्टी आणि केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता.

पोलीस तपासावर भाजपचा दबाव
शाहीन बाग गोळीबार प्रकरणात कपिल बैसला याला अटक करण्यात आल्यानंतर ’आप’ने पोलीस तपासावर प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणाचा तपास भाजपच्या दबावाखाली सुरू आहे. पोलिसांनी बैसलाच्या मोबाईलवरून मिळवलेला फोटो भाजपपर्यंत पोहोचलाच कसा, असा सवाल ’आप’चे खासदार संजय सिंग यांनी केला.