
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात राज्यातील भाजप नेत्यांत प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे त्यांना राज्यसभेवर पाठविण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीस दिल्लीत गेल्यास आपल्याला आनंदच होईल. महाराष्ट्राला त्याचा फायदाच होईल, असे मत व्यक्त केले आहे.
विधानसभा निवडणुकीतील पक्षांतर्गत पाडापाडीच्या राजकारणामुळे फडणवीसांविरोधात भाजपात असंतोषाचे वातावरण आहे. याचा परिणाम पक्षाच्या संघटनात्मक कामावर होऊ नये म्हणून त्यांना केंद्रीय राजकारणात नेण्याच्या हालचाली भाजपात सुरू झाल्या आहेत. मार्च महिन्यात राज्यसभेच्या सात जागा रिक्त होत असून फडणीस यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन त्यांना केंद्रात मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे. स्वतः फडणवीस तसेच प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी असे काही नसल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिल्लीला जायचे किंवा नाही हा निर्णय फडणवीस यांच्या मर्जीवर अवलंबून नाही. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ठरवले तर त्यांना जावेच लागेल असे मत व्यक्त केले. आपल्याबरोबर काम करणारा नेता जर केंद्रीय मंत्रिमंडळात असेल तर महाराष्ट्राला त्याचा चांगला उपयोग करून घेता येईल. त्याबाबत मला समाधानच काटेल. केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिल्यास फडणवीस नक्कीच केंद्रामध्ये जातील असे खडसे म्हणाले.






























































