
साहेब दोन दिवसांची सुट्टी घेतो…तत्काळ कामावर रुजू होतो, असे काहीही न सांगता विनापरवाना ठाणे महापालिकेचे 26 कर्मचारी 28 वर्षांपासून बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वॉर्डबॉय, फार्मासिस्ट, उपशिक्षिका, शिपाई या पदांवरील कर्मचारी वर्षानुवर्षे कामावर येत नसल्याने अखेर पालिका उपायुक्तांनी नोटीस काढली असून 30 दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश उपायुक्तांनी या कर्मचाऱ्यांना दिले आहेत. खुलासा सादर न केल्यास या कर्मचाऱ्यांची सेवेतून थेट हकालपट्टी करण्याचा इशाराही देण्यात आल्याने या दांडीबहाद्दरांचे धाबे दणाणले आहेत.
ठाणे महापालिकेत हजारो कर्मचारी काम करतात. मात्र त्यातील कामचुकार कर्मचाऱ्यांची यादी काढण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. यावेळी 28 वर्षांपूर्वी सुट्टीवर गेलेले कर्मचारी अद्याप कामावर पुन्हा रुजू न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. माळी बिगारी सुरेश जांभुर्लेकर 1990 पासून आणि राजाराम चव्हाण 1992 पासून गैरहजर आहेत. या दोघांप्रमाणे विविध कर्मचारी वर्षानुवर्षे गैरहजर असून यात महिला कर्मचाऱ्यांचाही भरणा आहे. संबंधित विभागात कोणालाही न कळवता कर्मचारी गैरहजर राहिले असून यादरम्यान त्यांनी या विभागातील कोणत्याही कर्मचाऱ्यांशी संपर्क न ठेवल्याचे नोटिसीत नमूद केले आहे. या कर्मचाऱ्यांना नोकरीची आवश्यकता नसल्याचे दिसून येत असून त्यांनी याप्रकरणी 30 दिवसांत खुलासा करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. 30 दिवसांत कर्मचाऱ्यांनी याबाबत खुलासा न केल्यास त्यांना पालिकेच्या नोकरीत स्वारस्य नसल्याचे गृहीत धरून कामावरून काढण्यात येईल, असे प्रशासनाने बजावले आहे. त्यानंतर या कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही.
हेच ते ‘दांडीबहाद्दर’
गवऱ्या साळवी (कॉर्डबॉय), हेमंत कट्टेवार (फार्मासिस्ट), अलका यालने, शीतल सावंत (प्रसाविका), चंचला मौळे, सरस्वती कोकणी (परिचारिका), बाळू हिलम, संतोष रोकडे, कैलास पाटील, राजू पवार (बिगारी), भक्ती देसाई, सीमा जमालुद्दीन (उपशिक्षिका), रघुनाथ वाघ, संजय घरत (आरक्षक), मुकेश राठोड, राजू रजोलिया, नंदा पवार, रतन थोरात, सुरेश साठे, बाळू भालेराव, प्रविण काघपंजे (सफाई कर्मचारी), राजाराम चव्हाण, दयानंद वावरे (वाहनचालक), अजय वेळके (उपस्थानक अधिकारी), विशाल गायकवाड (शिपाई), सुरेश जांभुर्लेकर (माळी बिगारी) आदी कर्मचारी विविध कार्यकाळापासून कामावर गैरहजर आहेत.




























































