भिवंडीत व्हॉटस् ऍपवर तलाक तलाक तलाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हॉटस् ऍपवर तलाक.. तलाक.. तलाक… असा मॅसेज टाकून पत्नीला सोडचिठ्ठी देऊन दुबईत पळून गेलेल्या नवरोबाला पोलिसांनी अमृतसर विमानतळावर बेड्या ठोकल्या आहेत. नदीम यासीन शेख असे या आरोपीचे नाव असून तलाक दिल्यानंतर तो सात महिन्यांपासून फरार होता.

टेक्निकल अभियंता असलेला नदीम शेख याचा फिर्यादी आरजू हिच्यासोबत 18 मे 2014 रोजी निकाह झाला होता. त्यावेळी हुंडा म्हणून आरजूच्या आई-वडिलांनी नदीम यास 10 हजार 51 रुपये रोख व संसारोपयोगी वस्तू हुंडा म्हणून दिल्या होत्या. मात्र लग्नाच्या काही दिवसांनंतर सासरच्यांनी पीडितेचा छळ सुरू केला. मात्र तरीही नदीमने नवीन घर घेण्यासाठी आरजूकडे माहेरहून पाच लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावला. त्याला नकार दिल्याने त्याने तिला बेदम मारहाण करून घराबाहेर काढले. तसेच व्हॉट्स ऍपवर मॅसेज पाठवून तलाक दिल्याचे सांगितले. तिहेरी तलाकला कायद्याने बंदी असल्याने पीडितेने थेट पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अटकेच्या भीतीने नदीम भिवंडीतून पळून दुबईत गेला. या प्रकरणाची गंभीर दाखल घेत भोईवाडा पोलिसांनी पासपोर्ट नंबरच्या आधारे आरोपी नदीमला ‘लुक आऊट’ नोटीस बजावली होती.

लपवाछपवीचा प्रयत्न फसला
मुंबईत परतल्यास पोलीस अटक करतील या भीतीने आरोपी दुबईहून विमानाने अमृतसरला उतरला. मात्र त्याआधीच ‘लुक आऊट’ जारी झाल्याने अमृतसर पोलिसांनी अटक करून भोईवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. गुरुवारी आरोपी नदीमला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी दिली आहे.