तहसील कार्यालयामुळे वाहतुकीची होतेय कोंडी, पोलीस हतबल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ग्रामीण क्षेत्रासाठी असलेले तहसील कार्यालय म्हणजे बेफिकीरपणे उभारलेल्या इमारतीचा नमुना आहे. विस्तीर्ण जागा असूनही ही इमारत कुठलेही नियोजन न करता उभारण्यात आली. त्यामुळे कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना तहसील कार्यालयात गेल्यानंतर मनस्तापाला सामोरे जावे लागते. सकाळी अकरापासून सायंकाळी सहापर्यंत या कार्यालयाच्या परिसरात नेहमीच वाहतुकीची कोंडी असते. विशेष म्हणजे या कार्यालयाच्या शेजारीच तालुका पोलीस ठाणेदेखील आहे.

धुळे शहरातील निरनिराळ्या शासकीय कार्यालयांपैकी तहसील कार्यालय एक आहे. आता या कार्यालयात ग्रामीण क्षेत्राचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. तर शहरी भागाच्या तहसीलदारांना प्रशासकीय संकुलात जागा देण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी तहसील कार्यालयाच्या इमारतीची उभारणी झाली. विस्तीर्ण क्षेत्रफळ असूनही इमारत उभारताना जागेचे नियोजन केले नाही. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या आवारात नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. रस्त्यालगतच ही इमारत असल्याने वाहनांचे कर्कश भोंगे ऐकत कर्मचाऱ्यांना काम करावे लागते. वाहतूक कोंडीमुळे अनेकदा ग्रामीण क्षेत्रातून आलेल्या नागरिकांना दूरवर वाहन उभे करून तहसील कार्यालय गाठावे लागते. अलीकडेच बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रक्टर चालकांवर कारवाई करण्यात आली. वाळूसह जप्त केलेले टॅक्टर तहसील कार्यालयाच्या आवारात आणून उभे करण्यात आले. त्यामुळे वाहतूक कोंडीत अशी वाहने मोठा अडसर ठरतात. प्रवेशद्वाराजवळच तहसीलदारांचे वाहन उभे राहते. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या आवारात येण्यासाठी अनेकांना तारेवरची कसरत करावी लागते.