
पुणे-सोलापूर महामार्गावर शहरातील सुमित पेट्रोल पंपाजवळ अपे रिक्षाला आयशर टेंपोने समोरा-समोर जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात अपेरिक्षातील एकाच धोत्रे कुटुंबातील चारजण जखमी झाले असून 10 वर्षाच्या लहान मुलाच्या मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास घडला असून या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
टेंभुर्णी येथील भवानी नगर येथे राहणारा लखन देविदास धोत्रे (वय – 32) हा पत्नी राणी लखन धोत्रे (वय- 27), मुलगा संस्कार लखन धोत्रे (वय- 10), दोन मुली चिमू लखन धोत्रे (वय- 5) व सिमरन लखन धोत्रे (वय- 3) यांच्यासह अपेरिक्षामध्ये (क्र-एम.एच-45 ए- 4940) बसून स्वतः चालवीत करकंब येथून टेंभुर्णी येथे जुन्या महामार्गावरून घरी येत होता. तो शहरातील सुमित हॉटेल जवळ आला असता शहरातून सोलापूरच्या दिशेने निघालेल्या सोनई दूध वाहतूक करणाऱ्या आयशर टेंम्पोने त्यास सामोरा-समोर जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, या धडकेत अपेरिक्षाचा चक्काचूर होऊन लखन धोत्रे, पत्नी राणी धोत्रे, दोन मुली चिमू धोत्रे व सिमरन धोत्रे हे एकच कुटुंबातील चारजण गंभीर जखमी झाले. तर मोठा मुलगा संस्कार लखन धोत्रे (वय- 10) हा डोक्यास गंभीर मार लागल्याने गंभीर जखमी होऊन उपचारास घेऊन जात असताना उपचारापूर्वीच मरण पावला. चार गंभीर जखमींना पुढील उपचारास पाठविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच एएसआय कांतीलाल माने यांनी पोलीस कर्मचाऱ्यासह घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारास पाठवून देऊन रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने हटविली. हा अपघात नेमका कसा घडला याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. अपघातानंतर टेम्पो चालक निघून गेला. या अपघाताचा अधिक तपास एएसआय कांतीलाल माने हे करीत आहेत.


























































