लोकलमध्ये बंगाली बाबांची पोस्टर्स चिटकवणाऱ्यास अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील लोकलमध्ये बिनधास्तपणे बंगाली बाबांची स्टीकर चिकटविणाऱयास रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी वडाळा आणि मस्जिद स्थानकादरम्यान रंगेहाथ अटक केली आहे.

लोकल ट्रेनच्या डब्यात बंगाली बाबांची पोस्टर्स चिकटवून गाडय़ांना विद्रुप करण्याचे प्रकार पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. अशा प्रकरणात काही वर्षांपूर्वी रेल्वे सुरक्षा दलाने धडक मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे असे प्रकार कमी झाले होते. आता पुन्हा मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये बंगाली बाबांची पोस्टर्स दिसू लागली आहेत. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाने पुन्हा एकदा कारवाईला सुरुवात केली आहे. रेल्वे सुरक्षा बलाच्या टीमने सोमवारी हार्बर मार्गावरील वडाळा ते मस्जिद दरम्यानच्या लोकलमध्ये सापळा रचून बंगाली बाबांचे पोस्टर्स चिकटविणाऱया शेख (25) नावाच्या इसमाला अटक केली. हा इसम बाबा गुरू हुसेनजी याची पोस्टर्स गाडीत चिकटवीत होता. या आरोपीची चौकशी करता त्याने यापूर्वी देखील अशाप्रकारचे दोन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. 2019 मध्ये त्याच्यावर अशाच दोन गुन्हय़ांची नोंद आहे. शेख याच्यावर ताज्य प्रकरणात रेल्वे कायद्यानुसार नवा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला 35व्या रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.