
जुलै ते ऑगस्ट 2019 या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकण, कोल्हापूरसह राज्यातील विविध भागांतील पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. या शेतकऱयांनाही दिलासा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या या शेतकऱयांचे पीककर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याविषयीचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.
राज्यातील शेतकऱयांचा सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर आता अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱयांनाही कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला. यासंदर्भात 3 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली होती. या बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्दय़ांच्या आधारे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने तत्काळ निर्णय घेत अतिवृष्टी झालेल्या शेतकऱयांनाही कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला.































































