
जम्मू-कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. अवघा देश या हल्ल्याने हादरला. पुलवामा हल्ल्याला आज एक वर्ष होईल. हल्ल्यातील जवानांना आदरांजली वाहण्यासाठी किशोर सरंगुला हे मुंबईकर ‘सोलो रन’ करीत पुलवामा येथे पोहचणार आहेत. शहीद जवानांसाठी 50 दिवसांत 2500 किमीचे अंतर पार करण्याचे लक्ष्य आहे. आज या उपक्रमाचा अंतिम टप्पा पार करीत ते आपले ध्येय गाठणार आहेत.
किशोर सरंगुला यांनी 25 डिसेंबर 2019 रोजी माहीम येथून दौडला सुरुवात केली. त्यांच्या दौडचा समारोप आज 14 फेबुवारीला होत आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, पंजाब आणि कश्मीर या पाच राज्यांतून त्यांनी 2500 किलोमीटर अंतर धावून कापले आहे. किशोर हे फॅशन आणि चित्रपट इंडस्ट्रीत गेली 25 वर्षे मेकअप कलाकार म्हणून काम करीत आहेत. दहा वर्षे मॅरेथॉनमध्ये ते नियमित भाग घेत आहेत. दहा हजारांहून अधिक किलोमीटर धावण्याचा आणि अल्ट्रा मॅरेथॉनचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे.
आपल्या देशातल्या तरुण पिढीसमोर उत्कट भावना आणि जाज्वल्य देशभक्तीचे उदाहरण ठेवण्याचा आणि धावण्याकडे एक क्रीडा प्रकार म्हणून बघण्यासाठी तरुण पिढीला प्रोत्साहित करण्याचा उद्देश सोलो रनमागील असल्याचे किशोर सरंगुला यांनी सांगितले.























































