झोपडीधारकांच्या पुनर्वसनानंतरच वांद्रे किल्ल्याचे सुशोभीकरण, शिवसेनेसह विरोधकांची ठाम भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वांद्रे किल्ला सुशोभीकरणाच्या कामात असणार्‍या 300 झोपडीधारकांच्या पुनर्वसनाची आधी हमी द्या, नंतरच किल्ल्याच्या सुशोभीकरणाचा उपक्रम राबवा अशी भूमिका आज शिवसेनेसह विरोधकांनीही घेतली. तसेच वांद्रे किल्ल्याबरोबरच मुंबईतील माहीम, शीव आणि धारावी अशा सर्वच किल्ल्यांचे सुशोभीकरण-दुरुस्ती करा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

पोर्तुगीजांनी बांधलेला वांद्र्याचा किल्ला पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून किल्ला परिसराचे सुशोभीकरणे केले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव आज स्थायी समितीत प्रशासनाने मांडला, मात्र काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक आसिफ झकेरिया यांनी उपसूचना मांडून आधी झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचे काय करणार, असा सवाल उपस्थित केला. याला शिवसेनेने पाठिंबा दिला. मुंबईतील सर्व किल्ल्यांचे सुशोभीकरण करण्याचे प्रस्ताव आणा अशी मागणी सभागृह नेत्या विशाखा राऊत, विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादीच्या राखी जाधव यांनी केली. यावेळी भाजपने प्रस्ताव मंजूर करण्यासाठी जोरदार मागणी केली, मात्र उपसूचना बहुमताने मंजूर झाल्यामुळे प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्यात आल्याची घोषणा यशवंत जाधव यांनी केली.  

…असा आहे प्रस्ताव

वांद्रे किल्ला परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामात किल्ल्ले परिसरातील मोडकळीला आलेली संरक्षक भिंत पाडून पुन्हा उभारली जाणार आहे. तसेच शोभिवंत जाळ्या, सुशोभित प्रवेशद्वार, शौचालय, गांडूळ खत तयार करण्यासाठी खड्डा, बेसाल्ट दगडाचे पदपथ बांधणे, हेरिटेज थीमच्या अनुषंगाने दिशा, चिन्हे आणि नाकाची पट्टी लाकणे, जल ठिकाणे बांधणे, खराब झालेली बैठक व्यवस्था दुरुस्त करणे, विद्युत दिवे, हिरवळीची कामे, आदी कामे केली जाणार आहेत. यासाठी 20 कोटींचा खर्च येणार आहे.