यशस्वी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> जयेंद्र लोंढे

क्रिकेटमध्ये करिअर घडविण्यासाठी उत्तर प्रदेशातील भदोईच्या भूपेंद्र व कंचन जयस्वाल यांचा अकरा-बारा वर्षांचा मुलगा मुंबईत येतो काय, काही काळ ओव्हल मैदानावरील तंबूत वास्तव्य करतो काय, पडेल ते काम करीत असताना अगदी पाणीपुरी विकतो काय, अन् उदयोन्मुख क्रिकेटपटू म्हणून नाव कमावतो काय. तो हाच 19 वर्षाखालील विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात देशासाठी विजयी षटकाराने शतक ठोकणारा यशस्वी जयस्वाल. 2020 च्या 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू. दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेतील ऐतिहासिक विजयामध्ये मुंबईवर यशस्वी जैस्वालने मोलाचे योगदान दिलं आहे.

एखाद्या गोष्टीवर अफाट प्रेम… प्रचंड मेहनत करण्याची तयारी… अन् दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर जग जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. याचे उत्तम उदाहरण हिंदुस्थानच्या अंडर 19 संघामधून धडाकेबाज कामगिरी करणारा यशस्वी जैसवाल.

उत्तर प्रदेशमधल्या बदोई जिह्यात यशस्वी आईवडील, भाऊ व बहिणींसोबत वास्तव्य करीत होता. वडील भूपेंद्रकुमार टेनिस क्रिकेट खेळत असल्यामुळे त्याची पावलेही त्याकडे वळली. वडीलांचा ऑइल पेंटचा छोटासा व्यवसाय. त्यांचा उदरनिर्वाह त्यावरच होत असे. त्यानंतर स्वतःच्या कामासाठी त्याच्या वडीलांनी मुंबई गाठली. ते स्वतःसोबत यशस्वीलाही घेऊन आले. पण वडिलांच्या रोजगाराचा प्रश्न मुंबापुरीत सुटला नाही. पण या मुंबापुरीत पाऊल ठेवताच तो क्रिकेटच्या दुनियेत मिसळून गेला. आझाद मैदानात क्रिकेट सामने बघत तो याचाच प्रेमात पडला.

एका नातेवाईकांच्या घरी तो वास्तव्याला होता, पण घर छोटे होते म्हणून तिथूनही त्याला बाहेर पडावे लागले. पप्पू सरांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचा सराव करू लागला. याचदरम्यान काळबादेवी येथील दूध डेअरीत तो वास्तव्य करीत छोटे-मोठे कामही करीत होता. अर्थात लहान वयात त्याला ते झेपत नव्हते. अखेर थोडय़ा दिवसांनंतरही ते घरही त्याला सोडावे लागले.

मुस्लिम युनायटेडमधून संधी पण…
– आझाद मैदान येथील मुस्लिम युनायटेडकडून त्याला मदतीचा हात मिळाला. त्यांच्याच टेंटमध्ये तो राहत होता. पण तिथे वीज नाही, पाण्याची सुविधा नाही. गावामधून मोजकेच पैसे येत होते. त्यामुळे त्याला स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी आझाद मैदानात पाणीपुरी विकावी लागत होती.

अन् कारकीर्दीला कलाटणी मिळाली
– यशस्वीच्या कारकीर्दीला कलाटणी मिळाली ती सांताक्रुझमध्ये. तेथे एक सामना सुरू होता. त्या खेळपट्टीवर इतर फलंदाजांची भंबेरी उडत होती, पण यशस्वीने दमदार फलंदाजी केली. ज्वाला फाऊंडेशनचे ज्वाला सिंग यांनी यशस्वीची फलंदाजी पाहून त्याला आपल्या ऍकॅडमीत संधी दिली. तिथपासून आतापर्यंत ज्वाला सिंगच्या अधिपत्याखाली यशस्वी प्रगतिपथावर रूढ होत आहे.

स्थानिक क्रिकेट गाजवले
– यशस्वीने हिंदुस्थानच्या अंडर 19 च्या संघात स्थान मिळवण्याआधी हॅरीस, गाइल्स शील्ड या मुंबईतील प्रतिष्ठsच्या स्पर्धा गाजवल्या आहेत. धावांचा पाऊस पाडलाय. एवढेच नव्हे तर फलंदाजही बाद केले आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी खेळताना सलग शतके झळकावत विक्रमावरही मोहोर उमटवलीय. याच स्पर्धेत एका डावात 200 धावांची खेळी करीत आपण ‘लंबी रेस का घोडा’ आहोत हे दाखवून दिलेय.

दिग्गजांकडून मोलाची मदत
– यशस्वीच्या आतापर्यंतच्या जडणघडणीत दिग्गज खेळाडूंच्या मोलाच्या टीप्सचाही सिंहाचा वाटा आहे. अंडर 19 वर्ल्ड कपआधी यशस्वी जैसवाल सचिन तेंडुलकर याला भेटायला गेला. त्यावेळी सचिन तेंडुलकर याने बराच वेळ त्याला क्रिकेटशी निगडित बारकावे समजावून सांगितले. त्यांच्या महत्त्वपूर्ण टीप्समुळे कव्हर ड्राइव्हमध्ये सुधारणा झाल्याचे यावेळी यशस्वी जैसवाल आवर्जून म्हणाला. दिलीप वेंगसरकर यांनी त्याला आपल्या संघातून खेळायला संधी दिली. इंग्लंडमध्ये खेळण्यासाठी पाठवले. राहुल द्रविड व आशीष कपूर यांनीही निर्णायक क्षणी मदत केली हे विशेष.

अजून बराच पल्ला गाठायचाय…
– यशस्वीने अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये ठसा उमटवला असला तरी त्याला अद्याप मोठा पल्ला गाठायचाय. देशासाठी खेळण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले आहे. सुनील गावसकर, कपिलदेव, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली या दिग्गजांप्रमाणे त्यालाही हिंदुस्थानच्या सीनियर संघातून खेळताना आपली चमक दाखवयाची आहे. पण सध्या तो जास्त पुढचा विचार करीत नाही. टप्प्याटप्प्याने प्रगती करण्याकडे त्याचा कल असणार आहे.

शिक्षण पूर्ण करता आलेले नाही
– यशस्वीने क्रिकेटमध्ये मोठी झेप घेतली खरी, पण त्याला अद्याप शिक्षण पूर्ण करता आलेले नाही. दहावीची परीक्षा त्याला अद्याप देता आलेली नाहीय. दरवर्षी तो फॉर्म भरत आहे, पण एकामागोमाग येणाऱया स्पर्धांमुळे त्याला परीक्षा देता येत नाही.

यशस्वी जैसवाल मायदेशी परतल्यानंतर त्याच्या भावना कोणत्या होत्या याबाबत ज्वाला सिंग यांना विचारले असता ते म्हणाले, यशस्वी निराश झाला होता. हिंदुस्थानला वर्ल्ड कप जिंकता आला नसल्यामुळे तो कमालीचा दु:खी होता. अंतिम लढतीत आणखी 30 ते 40 धावा केल्या असत्या, तर आम्ही जिंकलो असतो असे तो म्हणाला. तसेच त्याने एक महत्त्वाची बाब यावेळी बोलून दाखवली. आता मी विकेट फेकणार नाही. कारण त्या लढतीत जास्त धावा माझ्याकडून झाल्या होत्या. मला अखेरपर्यंत खेळपट्टीवर टिकणे गरजेचे होते. ते माझ्याकडून झाले नाही. अखेर आम्ही थोडय़ा फरकाने हरलो.

– [email protected]