आपला माणूस – दशावतारी रंगभूमीवरील मुस्लिम कलाकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सतीश पाटणकर

दशावतारी नाटके सादर होतात ती हिंदू देवदेवतांच्या कथानकांवर आधारित. म्हणून अन्य धर्मीय या कलेत सर्वसाधारणपणे दिसत नाहीत. मात्र कोकणात एक मुस्लिमधर्मीय कलाकार दशावतार कला सादर करीत आहे. उत्कृष्ट स्त्री भूमिका साकारून तो नावारूपाला आला आहे. त्याचे नाव अब्दुल कुंजाली नदाफ!

राजा श्रियाळ (केशव खांबल), राणी चांगुणा (अब्दुल नदाफ) आणि बाळ चिलिया, सिद्धेश्वर दशावतार नाटय़ मंडळ, दोडामार्ग. कोकणच्या प्रसिद्ध दशावतार कलेच्या माध्यमातून पारंपरिक कलेला आधुनिकतेची, वैचारिक प्रगल्भतेची आगळी जोड देत नावीन्यपूर्ण प्रयोग आज विविध नाटय़ कंपन्यांतून साकारले जात आहेत आणि त्यामुळेच पुन्हा एकदा दशावतार नाटकास आणि कलाकारास ऊर्जितावस्था प्राप्त झाली. कोकणची ही कला जिवंत ठेवण्यासाठी कलाकार प्रयत्नशील असतात. ही दशावतारी नाटके सादर होतात ती हिंदू देवदेवतांच्या पराक्रमांवर आधारित. म्हणून अन्य धर्मीय या कलेत नाहीतच. पण एका मुस्लिमधर्मीय कलाकाराने दशावतार कला सादर केली आणि आज एक उत्कृष्ट स्त्री भूमिका साकारून तो नावारूपाला आला आहे. त्याचे नाव आहे अब्दुल कुंजाली नदाफ! जो आता दोडामार्ग येथील सिद्धेश्वर कंपनीत प्रमुख स्त्रीपात्र भूमिका साकारत आहे. वेतोरे, ता. वेंगुर्ला येथील अब्दुल याने दशावतार कलेमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे आणि कलेपुढे कोणत्याही धर्माचे, जातीपातीचे बंधन नसते हे समाजाला दाखवून दिले. तसेच खरा कलाकार जातीधर्माच्या बंधनात अडकून पडत नाही हेही दाखवून दिले आहे. अब्दुलने आतापर्यंत कृष्ण-मारुती युद्ध (रुक्मिणी), भक्त पुंडलिक (रुक्मिणी), दुर्गाशक्ती (दुर्गा), कांचनगंगा (कांचन), शनी-लक्ष्मी युद्ध (लक्ष्मी), कामधेनू हरण (उषा) आदी स्त्री भूमिका साकारल्या आहेत. तसेच आजपर्यंत त्याने 500 पेक्षा अधिक नाट्यप्रयोग केले. विशेष म्हणजे मुस्लिम असूनही पौराणिक, वेदांतील प्रसंगांवर संवाद म्हणताना अब्दुल हे आव्हान लीलया पेलतो. कलेसाठी एवढी तळमळीची मानसिकता दाखवणारे हे एकमेव उदाहरण ठरावे. अब्दुलने आपल्या वेतोरे या गावातीलच श्रीदेवी सातेरी दशावतार नाटय़मंडळातून दहावीमध्ये असताना पहिला नाटय़प्रयोग केला. गावातील बाबी वेतूरकर यांच्याकडून स्त्री भूमिकेचे धडे घेतले. घरच्या परिस्थितीला हातभार म्हणून बारावीनंतर दोडामार्ग येथील सिद्धेश्वर दशावतार मंडळातून प्रयोग सादर केले. त्यानंतर कलेश्वर दशावतार व झरेबांबर येथील नाईक दशावतार नाटय़मंडळात स्त्री भूमिका साकारल्या. या तिन्ही मंडळांच्या बाबी कलिंगण व सागर नाईक, केशव खांबल यांनी आपणाला वेळोवेळी मार्गदर्शन केल्याचे तो सांगतो. सध्या तो दोडामार्ग येथील सिद्धेश्वर दशावतार नाटय़मंडळात मालक केशव खांबल यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री अभिनय करत आहे. कोणतीही व्यक्ती नावारूपाला येण्यासाठी त्याच्या कर्मभूमीचे महत्त्वही तेवढेच असते. गावातील श्रीदेवी सातेरीमुळे आपण घडलो, पहिला नाटय़प्रयोग या देवीच्या मंडपात करण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य असे नदाफ सांगतो. त्यावेळी गावातील लोकांनी आपल्यावर कौतुकाची थाप दिली. बाबी वेतूरकर आणि संतोष मांजरेकर यांनी केलेले मार्गदर्शन आजही उपयोगी येत आहे. त्यामुळे आज मी माझी कलाकार म्हणून जी ओळख आहे ती वेतोरेवासीयांच्या सहकार्यामुळेच आहे असे ऋण अब्दुल मान्य करतो. कोकणात दशावतार ही प्रसिद्ध व महत्त्वाची लोककला. ही कला टिकवण्यासाठी जवळपास पन्नासच्यावर दशावतार कंपन्या, विविध नामवंत कलाकार आहेत.

दशावतारी रंगभूमीने ओमप्रकाश चव्हाणसारखे दिग्गज कलाकार रंगभूमीला दिले. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी दशावतारात काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला एकवेळची जेवणाची भ्रांत मिटेल एवढाच त्यांचा नाटकात काम करायचा उद्देश होता, परंतु कालांतराने त्यांना गोडी लागली व 30 वर्षांत त्यांनी जवळपास आठ हजार प्रयोगांमधून काम केलं. त्यांची अभिनयाची समज व स्त्रीमधील बारकावे हेरून ते अभिनयात मांडण्याची ताकद निव्वळ लाजवाब आहे. 2015 मध्ये त्यांना नाटक करताना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांचं करीअर जवळजवळ संपलं, परंतु गेल्या तीन दशकांत दशावतारी कला जिवंत ठेवण्यासाठी ज्या कलाकारांनी कष्ट घेतले त्यात अब्दुल कुंजाली नदाफ याचे नावही घ्यावे लागेल. त्याचे हे नाटय़प्रेम खरोखरच धार्मिक एकोप्याचे प्रतीक आहे. धार्मिक सलोख्याच्या बाबतीत इतर क्षेत्राप्रमाणे सिंधुदुर्ग प्रथम क्रमांकावर असल्याचे हे उदाहरण मानता येईल. दशावतारी नाटय़प्रकारात व्यावसायिक नाटकांप्रमाणे भरपूर पैसा नाही, परंतु समाधान मात्र निश्चित असते. इतर लोककला काळाच्या उदरता गडप होत असताना दशावतार मात्र आपलं अस्तित्व टिकवून आहे.

– [email protected]