
नाटक, टीव्ही मालिका, सिनेमा आणि आकाशवाणी अशा विविध माध्यमांतून आपल्या कसदार अभिनयाची छाप सोडणारे ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचे आज निधन झाले. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारापूर्वीच दुपारी 12 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लाखो चाहत्यांवर मोहिनी घालणारा हा ‘लोकनाटय़ाचा राजा’ वयाच्या 90व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. राजा मयेकर यांच्या पार्थिवावर भोईवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजा मयेकर यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी दशावतारी नाटकांच्या माध्यमातून रंगभूमीवर पाऊल ठेवले. मालवणी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. दूरदर्शनवरील ‘गप्पागोष्टी’ या मालिकेतून ते महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. हजरजबाबी विनोद आणि त्याला अत्यंत साजेसा अभिनय करणारा कलाकार म्हणून राजाभाऊंची जनसामान्यांमध्ये ओळख होती.
मराठी रंगभूमीचा राजा हरपला! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून श्रद्धांजली
मराठी रंगभूमीवर सात दशकं अधिराज्य गाजवणारे चतुरस्र अभिनेते राजा मयेकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे तीव्र शोक व्यक्त केला. मराठी रंगभूमीचा राजा हरपला अशा शब्दांत त्यांनी आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, राजा मयेकर यांनी आपल्या अभिनयाने अनेक नाटकं गाजवली. कोडय़ाची करामत, कोयना स्वयंवर, नशीब फुटके सांधून घ्या, बापाचा बाप अशी प्रहसने त्यांनी सादर केली. गिरणगावातून पुढे आलेल्या या कलावंताने रंगमंचावर महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची व्यथा सादर केली. शिवसेनेच्या स्थापनेवेळी शाहीर साबळे यांच्या ‘आंधळं दळतंय’ या लोकनाटय़ाने जागृती केली. त्यात राजा मयेकरांची भूमिका अविस्मरणीय होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते. शिवसेनेच्या अनेक सोहळय़ांना त्यावेळी त्यांची आवर्जून उपस्थिती असे. दादा कोंडके यांच्याबरोबर ‘विच्छा माझी पुरी करा’चे अनेक प्रयोग त्यांनी केले. मराठी चित्रपटसृष्टीचा पडदाही त्यांनी गाजवला. त्यांच्या अभिनयशैलीत कोकणी माणसाचा अस्सल मराठी बाज होता. मराठी रंगभूमीचा जुनाजाणता शिलेदार आपल्यातून निघून गेला आहे. लाखो शिवसैनिकांतर्फे तसेच महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, असेही त्यांनी सांगितले.
लोकनाट्याचा राजा
राजा मयेकर यांची पहिली ओळख म्हणजे दशावतारी कलाकार. दशावताराच्या माध्यमातूनच त्यांनी रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले. दशावतारी कलाकार म्हणून ते लोकप्रिय झालेच पण त्यानंतर नाटके, सिनेमा, टीव्ही मालिका यांमधूनही दर्शकांना राजाभाऊ नेहमीच हसवत राहिले. मुळात त्यांचा चेहराच हसरा होता. त्यांना पाहिल्यानंतरच लोकांच्या चेहऱयावर हसू उमटायचे. हजरजबाबी विनोद आणि त्याला अत्यंत साजेसा अभिनय करणारा कलाकार म्हणून राजाभाऊ चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाले होते. राजा मयेकर यांची विनोदी कलाकार म्हणून ख्याती असली तरी खलनायकाची भूमिकाही तितक्याच ताकदीने सादर करण्याची कलाही त्यांच्यात होती. अशा या हरहुन्नरी कलाकाराची एक्झिट रसिक प्रेक्षकांबरोबरच सिने नाटय़सृष्टीला हुरहूर लावून गेली.
गावी चौथीपर्यंत शिक्षण केल्यानंतर राजा मयेकर मुंबईत आले. कोकणातील असल्याने त्यांना दशावताराबद्दल सुरुवातीपासूनच आकर्षण होते. मुंबईत आल्यानंतर त्यांनी महानगरपालिका शाळांमध्ये वेशभूषा स्पर्धेत भाग घेतला. वेशभूषेतून आपण लोकांना हसवू शकतो असा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला आणि त्यानंतर आयुष्यभर त्यांनी लोकांना खूप हसवले.
राजा मयेकर हे एक सच्चा कलाकार होते. त्यांनी कलेवर जिवापाड प्रेम केले. कुणाचीही नोकरी पत्करण्याऐवजी त्यांनी लालबाग येथे फोटो स्टुडिओ काढला. नाटकांवर त्यांचे प्रेम होते. अभिनय त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यांनी इंद्रकला नाटय़मंडळ संस्थेची स्थापना केली. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि इतर विविध उत्सवांमध्ये या नाटय़संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ‘गुरुदक्षिणा’, ‘खोली पाहिजे’ ही नाटके सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
राजा मयेकर नावाच्या कलाकाराचे संवादफेकीतील स्पष्ट उच्चार ऐकून कृष्णराव गणपत साबळे म्हणजेच शाहीर साबळे यांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. शाहीर साबळे हे मुंबईत वास्तव्याला आले तेव्हा त्यांच्या सहवासात देशावरचे लोक अधिक होते. त्यामुळे शाहीरांची भाषाही तशीच रांगडी होती. राजा मयेकरांची शुद्ध मराठी भाषा शाहीरांना आवडली. ही दोन्ही माणसे कलेची पुजारी होती. कलाक्षेत्रावर त्यांचे जिवापाड प्रेम होते. शाहीर साबळे यांच्या पार्टीमध्ये राजा मयेकर यांचा प्रमुख कलाकार म्हणून समावेश झाला. ‘आंधळं दळतंय’, ‘असूनी खास मालक घरचा’, ‘यमराज्यात एक रात्र’ अशी त्यांची मुक्तनाटय़े तुफान गाजली.
नाटक म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे तर समाजप्रबोधनाचे साधन आहे असा राजाभाऊंचा आग्रह असायचा. कोडय़ाची करामत, कोयना स्वयंवर, नशीब फुटके सांधून घ्या, बापाचा बाप अशी प्रहसने त्यांनी सादर केली. ‘गुंतता हृदय हे’ या नाटकातून त्यांनी उभा केलेल्या खलनायकाला दर्शकांनी डोक्यावर उचलून घेतले. राजा मयेकर यांनी अनेक चित्रपट, टीव्ही मालिकांमध्येही काम केले. विनोदी भूमिकांमुळे ते महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये पोहचले.
– राजा मयेकर यांनी अनेक चित्रपटांमध्ये केलेल्या भूमिका गाजल्या. लालबागचा राजा, करायचं ते दणक्यात, लढाई, समरग्नी, दिल कि बाझी, येडा की खुळा, जीवा सखा, इजा बिजा तिजा, धमाल बबल्या गणप्याची, कळत नकळत, नवरा बायको, आई पाहिजे, अर्धांगी, महानंदा, आपलेच दात आपलेच ओठ, चटक चांदणी, गोष्ट धमाल नाम्याची, नवरे सगळे गाढव, कुवारी, सिंहासन, चंद्र होता साक्षीला, दोस्त असावा तर असा, या सुखांनो या, धाकटी बहीण, टिळा लाविते मी रक्ताचा, धरमपत्नी, ही नार, सुंदरी, युगे युगे मी वाट पाहीन, मोहित्याची मंजुळा, स्वयंवर झाले सीतेचे, ग्यानबा तुकाराम आदी चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला.


























































