आजपासून सुरू होणार जीएसटी भवनमधील कामकाज; अग्निशमन दलाचा तपासणी अहवाल आठ दिवसांत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माझगावमधील जीएसटी भवनला लागलेल्या भीषण आगीनंतर बंद ठेवण्यात आलेल्या इमारतीच्या कामकाजाला गुरुवार, 20 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. बेस्ट आणि अग्निशमन दलातर्फे आगीच्या तपासाची कारणे शोधण्यासाठी ही इमारत दोन दिवस बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान, अग्निशमन दलाचा तपासणी अहवाल पालिकेला आठ दिवसांत सादर करणार आहे अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱयाने दिली.

जीएसटी भवनला गेल्या सोमवारी लागलेल्या आगीत इमारतीचे आठ, नऊ आणि दहा असे तीन मजले जळून खाक झाले. त्यामुळे या इमारतीत काम करणाऱया सुमारे दोन ते सव्वादोन हजार कर्मचाऱयांना दोन दिवस सुट्टी देण्यात आली होती. अग्निशमन दलाने इमारतीची पाहणी केल्यानंतर गुरुवारपासून येथील कामकाज पुन्हा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे तीन दिवसांनंतर कर्मचारी, अधिकारी कामावर रुजू होणार आहेत.

सहाव्या मजल्यापर्यंत कामकाज चालणार

जीएसटी भवनला लागलेल्या आगीत आठ, नऊ आणि दहा असे तीन मजले जळून खाक झाले होते. सातव्या मजल्यावर कॉन्फरन्स हॉल आणि इतर छोटी ऑफिसेस असल्यामुळे हा मजलाही सुरक्षेच्या कारणांमुळे बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे उद्यापासून सहाव्या मजल्यापर्यंतच कामकाज चालणार आहे, असे जीएसटी प्रशासनाने सांगितले.