परळीच्या वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त अलंकारीत पूजा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथांच्या महाशिवरात्र पर्वाला गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरुवात झाली. वार्षिक उत्सव असलेल्या महाशिवरात्री निमित्त वैद्यनाथ मंदिरात प्रभू वैद्यनाथांची अलंकारीक पूजा मांडण्यात आली असून वैद्यनाथाचे हे रूप पाहण्यासाठी भाविक वैद्यनाथ मंदीरात दाखल होत आहेत. महाशिवरात्री निमित्त मंदिरात प्रशासनाकडून दर्शन व्यवस्था,कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन काळजी घेत आहे.

महाशिवरात्रीनिमित्त प्रभू वैद्यनाथाला दागिन्यांची सजावट करण्यात आली आहे. या अलंकारीक पूजेच्या प्रभू वैद्यनाथांच्या रुपाला आपल्या डोळ्यात सामावून घेण्यासाठी भाविकांनी गुरुवारी रात्रीपासून गर्दी करायला सुरुवात केली. कांतीपुरी, वैजयंतीक्षेत्र, जयंतीक्षेत्र, प्रभाकर क्षेत्र,पर्यली ही परळी वैजनाथ ची प्राचीन नावे आहेत.जगाच्या उद्धारासाठी भारतभुमीत शिवलिंग आवतरले.वायूच्या संघर्षाने या ज्योतिर्मय स्वरुपाचे बारा भाग होउन ते इतस्ततः विखुरले तीच आज प्रसिद्ध असलेले ज्योतिर्लिंगे होत असा उत्पत्ती विषयी ‘परळी महात्म्य’ या प्राचीन ग्रंथात उल्लेख आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला तेरा बोटे लांब व त्याचे साडे सातशे पदरी वात अर्पण करून आरती केल्यास भक्तांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात अशीही आख्ययिका असल्याचे पं. विजय पाठक यांनी सांगितले आहे.