
>> आसावरी जोशी
27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन. निमित्त आपल्या कुसुमाग्रजांचा जन्मदिन… देवी वागीश्वरीची तात्यासाहेबांच्या लेखणीवर विशेष माया… म्हणूनच ही सारस्वती एकमेकांत मिसळलेली…
जगण्यातील काही गोष्टी या आपल्या हृदयाच्या अगदी जवळ असतात. किंबहुना त्या आपल्या जगण्याचे अविभाज्य अंग असतात, अगदी जन्माच्या आधीपासूनच. आपल्या आईसोबतच त्यांच्याशी आपले नाळेचे नाते असते कधीही न तुटणारे… आई आपले शारीरिक, मानसिक पालनपोषण करीत असते तर या अविभाज्य गोष्टी आपल्या संस्कारात भर घालून आईशी, मातीशी आपल्याला घट्ट बांधून ठेवत असतात. या सुंदर नात्यातूनच आपण या साऱयांना थेट आईचा दर्जा देतो. त्यांचा उल्लेखच आईपणाच्या गोडव्यातून होत असतो. माता… मातृभूमी… मातृभाषा… मातृ या दोन्ही अक्षरांनी या गोष्टी अगदी सायीसारख्या प्रेमळ आणि आभाळाहून उंच होतात.
आपल्या भूमीवरची माती आईचेच काम करीत असते. धावता धावता पडल्यावर आईच्या मायेची फुंकर लाल, काळी मातीच घालते. माती जरी तिचे काम अबोलपणे करीत असली तरी आपल्याच आईशी प्रेमळ, लडिवाळ संवाद साधण्यासाठी अखंड आपली सोबत करते आपली मातृभाषा. आठवली म्हणून सहजच एक गोष्ट सांगावीशी वाटते. ‘एक अत्यंत हुशार मुलगा… शाळेत… महाविद्यालयात नेहमी पहिला. अभ्यास… खेळ… परीक्षा या साऱया धामधुमीत आपल्या आईशी निवांत संवाद साधणे… गप्पा मारणे राहूनच जाते.
पुढे उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा योग येतो. त्याची हुशारी पाहून त्याला तिथेच नोकरीही मिळते. तो परदेशातच स्थिरावतो, पण या सगळय़ा प्रगतीत आपल्या आईशी निवांत गप्पा मारायच्या राहूनच जातात. आईशी खूप लहानपणी केलेल्या निर्व्याज गप्पांची त्याला खूप आठवण येऊ लागते. आईची माया हवीशी वाटू लागते. लगेच उठून आईपाशी येणे तर शक्यच नसते. तो ठरवतो, आईशी आता आपण पत्रांतून संवाद साधायचा. जे बोलायचे राहून गेले आहे ते लिहून व्यक्त व्हायचे. तो लेखणी आणि कागद घेऊन बसतो, पण येथे मात्र तो खऱया अर्थाने हरतो. कारण सतत इंग्रजीचा वापर केल्याने तो आपली मातृभाषा मराठी पुरती विसरलेला असतो. आणि आईला मराठीशिवाय काहीच येत नसते. आपल्या हुशारीने यशाचा प्रत्येक सोपान चढणारा हा मुलगा येथे मात्र हतबल होतो.
आपली मातृभाषा मराठी… ती टिकेल… नाही टिकेल याचा व्यर्थ ऊहापोह नेहमीच होत असतो; पण येथे मला असे वाटते, जोपर्यंत प्रत्येक मराठी मुलाला आपल्या आईशी संवाद साधावासा वाटतो तोपर्यंत ज्ञानियांच्या या भाषेला कोणीही धक्का लावू शकत नाही. आपल्या भाषेचे कोडकौतुक आपण या न त्या रूपाने करतच असतो. म्हणूनच आपल्या कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. आई वागीश्वरीला निरंतर सारस्वताचा सहवास प्रिय आहे. म्हणूनच तिच्या प्रासादात कुसुमाग्रजांच्या लेखणीचा अखंड निवास आहे.
प्रत्येक साहित्यिकाच्या शब्दलेण्यांनी आपली सारस्वती सजली आहे, पण तात्यासाहेबांच्या लेखणीला राजहंसाचा मान मिळाला आहे. कारण त्यांची लेखणी तशीच आहे… अगदी शुभ्र हंसागत पवित्र, देखणी, सात्त्विक आणि वेळप्रसंगी समाजातील अनिष्टांवर चपखल आसुड ओढणारी. कुसुमाग्रजांचा प्रत्येक शब्द, त्यांची प्रत्येक कविकल्पना जणू सरस्वतीच्या आशीर्वादानेच साकार होते. त्यांच्या अत्यंत तलम, राजस भाषाशैलीतून कौंतेय अवतरला, विजेचा लोळ झाशीच्या राणीच्या रूपाने भूतलावर आला. पृथ्वीची प्रेमकथा अजरामर झाली. अहिनकुलाच्या परंपरागत भांडणाला वेगळीच किनार लाभली. आगगाडी आणि जमिनीतून भूमीची व्यथा साकार झाली. प्रेयसीचे चांदण्याचे हात स्वप्नवत ठरले. काय आणि किती वर्णने करावीत!
वर्तमानपत्रात काम करीत असताना कुसुमाग्रजांनी वृत्तपत्राला दुसऱया महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर मथळा दिला, ‘पृथ्वी रक्तस्नानास निघाली’. अर्थात हा काव्यात्म मथळा सामान्य माणसास समजणार नाही म्हणून बदलला गेला. हा प्रसंग सांगताना तात्यासाहेब हसत हसत म्हणाले होते, ‘मी तेव्हाच समजून चुकलो की, हे कार्यक्षेत्र आपले नाही.
त्यांचे सागरावरचे प्रेम बालकवितेतून उमटते, तर पारिजातकाची फुले गळून पडणे त्याची तपश्चर्येतून आलेली संन्यस्त वृत्ती दाखवते. नाशकावर तात्यांचे विशेष प्रेम. आजूबाजूच्या वस्तीत राहणारे आदिवासी, कामगारवर्ग हे तात्यांचे जीवलग. देवापासून ठरावीक अंतर राखून असणारे तात्यासाहेब सर्वसामान्यांसाठी मात्र सर्वात्मकाची आळवणी करतात. प्रेम… क्रांती… आर्तता… उत्कटता साऱयाची भावभावनांची अभिव्यक्ती तात्यासाहेबांच्या लेखणीत सामावते आणि त्यांच्या मूळ प्रांजळ, निर्लेप व्यक्तिमत्त्वाला अधिकच राजस आणि तेजस्वी बनवते.
- आपल्या मराठी भाषेला खूपच मोठी परंपरा आहे. ही इंडो-युरोपिय कुलातील भाषा आहे.
- मराठी भाषा ही नवव्या शतकापासून प्रचलित असून तिची निर्मिती संस्कृतपासून उत्पन्न झालेल्या महाराष्ट्रीय, प्राकृत भाषांपासून झाली आहे. आपल्या देशातील प्रमुख 22 भाषांपैकी मराठी एक आहे.
- मराठी मातृभाषा असणाऱया लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व हिंदुस्थानातील तिसरी भाषा आहे. 2011च्या जनगणनेनुसार मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या 9 कोटी आहे.
- हिंदुस्थानात मराठी महाराष्ट्राखेरीज गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामीळनाडू व छत्तीसगढ तसेच दमण, दीव, दादरा, नगर हवेली येथेही मराठी भाषा बोलली जाते. देशातील 36 राज्ये आणि 72 देशांमध्ये मराठी भाषिक राहतात.
- मॉरिशस व इस्रायल या देशांतही मराठी बोलली जाते, तसेच संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, सिंगापूर, जर्मनी, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथेही मराठी बोलली जाते.
- ‘लीळाचरित्र’ हा म्हाईंभटांचा आद्य ग्रंथ. मराठीत दरवर्षी दोन हजार नवीन पुस्तकं प्रकाशित होतात. सुमारे 500 दिवाळी अंक प्रसिद्ध होतात. 250 साहित्य संमेलने भरतात. या सर्वांची उलाढाल 250 कोटींपर्यंत आहे.
- चरित्रकोश, शब्दकोश, वाङ्मय कोश, विश्वकोश, संस्कृतीकोश याबाबतीत मराठी भाषेचा जगात दुसरा क्रमांक लागतो.
छत्रपती शिवरायांनी मराठी भाषेस राजाश्रय दिला. - मराठी भाषेचे वय हे साधारणपणे 1500 वर्षे मानले जाते. शिवरायांनी रघुनाथ पंडितांकडून राजव्यवहार कोश करून घेतला व त्यात फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द वापरण्यात आले.

























































