
शिवाजी पार्क-दादर परिसरातील ‘बेस्ट’ बस स्टॉप आता व्हर्टिकल गार्डनने फुलणार आहेत. महापौर बंगल्याजवळील बसस्टॉपपासून या अभिनव उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे परिसराचे सौंदर्य खुलणार असून अपघातांनाही आळा बसणार आहे. सुरुवातीला या उपक्रमात आठ बेस्ट बस स्टॉपवर व्हर्टिकल गार्डन सुरू करण्यात येणार आहे.
पालिकेच्या जी/नॉर्थ विभागात सौंदर्यीकरणासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये इको टॉयलेट, ठरावीक अंतरावर बैठक व्यवस्था, पिण्यासाठी स्वच्छ पाणी आणि बगिचा असलेली 4.5 किमीची युनिक फुटपाथ माहीम कॉजवे ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत तयार करण्यात येत आहे. याच धर्तीवर आता दुभाजक, वाहतूक बेटांवर छोटे बगिचे, शिवाजी पार्क-दादरमधील ‘बेस्ट’ बसस्टॉपवर व्हर्टिकल गार्डन तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बसस्टॉप आणि फुटपाथच्या सौंदर्यीकरणामुळे रस्त्यावरून चालणाऱया प्रवासी-नागरिकांची संख्या कमी होणार असल्यामुळे अपघातांचे प्रमाणही कमी होणार असल्याची माहिती सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.
चार दिवसांत आठ ठिकाणी काम
बस स्टॉप व्हर्टिकल गार्डन उपक्रमात माहीम ते सिद्धिविनायकपर्यंतच्या स्टॉपवर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात जुना महापौर बंगला येथील बस स्टॉपपासून करण्यात आली आहे तर इतर सात बस स्टॉपवर येत्या चार दिवसांत काम पूर्ण करण्यात येणार आहे. दरम्यान, या व्हर्टिकल गार्डनच्या देखभालीसाठी संस्थांनी पुढे यावे असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
प्रदूषणाचा सामना करण्यासाठी मुंबईत जास्तीत जास्त वने विकसित करणे, हिरवळ वाढवणे, उद्याने-मैदानांचा विकास करण्यावर भर देण्यात येत आहे. या उपक्रमात पूल, फ्लायओव्हरखाली, रस्ता दुभाजक व्हर्टिकल गार्डन सुरू करण्यावर भर देण्यात येणार आहे.
– प्रवीण परदेशी, पालिका आयुक्त




























































