
राणीबागेत आणलेल्या वाघांसाठी जंगली अधिवास तयार करण्यात येणार आहे. यामध्ये गुहा, झाडेझुडपे, वेली, हिरवळ आणि पाणथळ ठिकाणांसह नैसर्गिक जंगलाप्रमाणे अधिवास तयार करण्यात येणार आहे. हे वाघ सध्या देखरेखीखाली असून मार्चपासून पर्यटकांना पाहता येणार आहेत.
पर्यावरण-पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून पालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान क प्राणीसंग्रहालयात मार्च 2017 मध्ये केवळ परदेशात आढळणारे दुर्मिळ ‘हम्बोल्ट पेंग्विन’ आणल्यापासून या ठिकाणी भेट देणाऱया पर्यटकांच्या संख्येत हजारोंच्या संख्येने वाढ झाली असून मासिक उत्पन्नही लाखोंनी वाढले आहे. शिवाय आता संपूर्ण उद्यानाच्या अत्याधुनिकीकरणासह खुँखार तरस, आक्रमक बिबटय़ा, अस्वल, देशीपरदेशी पक्षी, कास व, भलामोठा अजगर, नाग अशा प्राण्यांसह मागील आठवडय़ात संभाजीनगरहून वाघांची जोडीही आणण्यात आली आहे. या वाघांना नैसर्गिक अधिवास देण्याच्या कामासाठी एक कोटी 33 लाख 39 हजार 804 रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.
चार हजार चौरस मीटर जागेत सुविधा
वाघाला नैसर्गिक अधिवासाप्रमाणे जागा निर्माण करण्यासाठी चार हजार स्क्वेअर मीटर जागेत झाडेझुडपे, वृक्ष, वेली, हिरवळीची लागवड केली जाणार आहे. यामध्ये जंगली झाडांप्रमाणे बांबू प्लांट, काटेसावर, कडुनिंब अशी झाडे लावण्यात येणार असून पिंजऱयांसोबत गुहेच्या स्वरूपात निवासव्यवस्थाही तयार करण्यात येणार आहे. या कामाचे कंत्राट मे. डी. बी. इफ्राटेक यांना देण्यात येणार आहे. एक वर्षाच्या या कामात संबंधित कामाच्या देखभालीची जबाबदारीही कंत्राटदारावर असेल.
14 वर्षांची प्रतीक्षा संपणार
दरम्यान, गेल्या आठवडय़ात संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यान प्राणीसंग्रहालयातून पट्टेदार वाघाची जोडी राणीबागेत आणण्यात आली आहे. चार वर्षांचा नर वाघाचे नाव ‘शक्ती’ आणि मादीचे नाव ‘करिश्मा’ असे आहे. सध्या हे वाघ देखरेखीखाली ठेवण्यात आले असून मार्च महिन्यात पर्यटकांना पाहता येणार आहेत. यामुळे तब्बल 14 वर्षांनंतर पर्यटकांना राणीबागेत पुन्हा वाघ पाहता येणार आहेत.
लवकरच ऍनाकोंडाही आणणार
राणीबागेत लवकरच जगात महाकाय म्हणून ओळखला जाणारा ऍनाकोंडा आणला जाणार आहे. याशिवाय विविध 21 प्रकारचे सापही आणले जातील. यामध्ये नाग, अजगर, तस्कर, मण्यार, धामण, घोणस, मांडूळ, पाणसर्प, फुरसे, हरणटोळ असे देशी तर ऍनाकोंडा, मॉनिटर लिझार्डसारखे विदेशी सापही आणले जाणार आहेत. यासाठी केंद्रीय प्राणीसंग्रहालयाच्या मंजुरीसाठी हालचाली सुरू केल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.































































