
कोकणच्या पर्यटन विकासासाठी आराखडा करण्यात आला असून स्थानिकांना रोजगार, समुद्रकिनारे, हॉटेल याबाबत धोरण तयार करण्यात येत आहे. कोकणामध्ये आता पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण होत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम तसेच चिपी विमानतळदेखील सुरू होत आहे. त्यामुळे कोकणच्या पर्यटन विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे, असे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले.
शिवसेना आमदार वैभव नाईक, भास्कर जाधव यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले. यावेळी वैभव नाईक यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग किनारपट्टीच्या विकासासाठी काय तरतूद आहे, असा सवाल केला. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या विकासासाठी असलेल्या निधीसंदर्भात कोणती कारवाई करण्यात आली, असा प्रश्न केला. यावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, कोकणामध्ये आता पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण होत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम तसेच चिपी विमानतळदेखील सुरू होत आहे. त्यामुळे कोकणच्या पर्यटन विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे.
परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्र आघाडीवर ठेवा!
उद्योग क्षेत्राने थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राची आघाडी कायम ठेवावी असे आवाहन पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज केले. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीतर्फे (सीआयआय) आयोजित परिषदेमध्ये ते बोलत होते.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 60 वर्षे पूर्ण होत आहेत असे सांगतानाच शिक्षण, आरोग्य आणि अन्य सुविधांमार्फत समाजाच्या सर्व घटकांमध्ये समतोल राखण्याची गरज असल्याचे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबालगन, आदित्य बिर्ला समूहाचे डॉ. अजित रानडे, सीआयआय महाराष्ट्र राज्य कौन्सिलचे अध्यक्ष कश्मीरा मेवावाला यांनी यावेळी राज्यातील उद्योग क्षेत्रातील घडामोडींबाबत माहिती दिली.































































